लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत्रा मार्केटजवळ एका भरधाव कारने साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याला चिरडले. चिमुकल्याचे पालक त्याला घेऊन काही दिवसांअगोदरच नागपुरात मजुरीसाठी आले होते व संत्रा मार्केटजवळील फुटपाथवर राहत होते. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
गच्छाली सजित मलाकार (२८, चंद्रपूर) असे तक्रारदाराचे नाव आहे. गच्छाली केळे विक्रीचे तसेच मजुरीचे काम करतो व चांदशाह दर्ग्याजवळ झोपडी बनवून कुटुंबियांसह राहतो. त्याचा नातेवाईक चंदू मलाकार हा पत्नी व दोन मुलांसह मजुरीसाठी पंधरा दिवसांअगोदर नागपुरात आला. तेदेखील गच्छालीसोबत रहायचे. शनिवारी आठ वाजताच्या सुमारास चंदूचा साडेतीन वर्षांचा मुलगा आदी हा इतर मुलांसोबत खेळत होता. खेळता-खेळता झोपडयातुन बाहेर चांदशाह दर्गासमोरील रोडवर आला. समोर एक मुलगा त्याला बोलवत असल्याने तो जात असताना कॉटन मार्केटकडून भरधाव वेगाने पांढऱ्या रंगाची कार आली व आदीला धडक देऊन निघून गेली. त्याच्या पालकांनी धाव घेतली असता आदीच्या डोके व कानातून रक्त येत होते. त्याला मेयो इस्पितळात नेले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गच्छालीच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.