नागपूर : वेगात आलेल्या ट्रॅक्टरने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात माेटारसायकलवर बसलेल्या आईच्या कवेत असलेला चिमुकला सिमेंट राेडवर आदळला आणि त्यातच त्याचा अंत झाला. ही घटना खापा (ता. सावनेर) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर-खापा मार्गावरील काेदेगाव (ता. सावनेर) शिवारात बुधवारी (दि. १) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली.
राेहित देवेंद्र शिवणकर (३ महिने) असे मृत चिमुकल्याचे नाव असून, जखमींमध्ये राेहितची आई मीनाक्षी देवेंद्र शिवणकर (२३, रा. करंभाड, ता. पारशिवणी) मामा आशिष रामाजी चंदनकार (२६) आणि मावशी पूजा रामाजी चंदनकर (१८), दाेघेही रा. काेच्छी, ता. सावनेर या तिघांचा समावेश आहे. मीनाक्षी आजारी असल्याने ती आशिष व पूजासाेबत सावनेर शहरातील हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी आली हाेती.
सायंकाळी तिघेही एमएच-४०/बीवाय-९५७१ क्रमांकाच्या माेटारसायकलने सावनेरहून काेच्छी येथे जात हाेते. ते काेदेगाव शिवारात पाेहाेचताच विरुद्ध दिशेने म्हणजेच खाप्याहून सावनेरला वेगात येत असलेल्या ट्रॅक्टरने माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यामुळे राेहित फेकला गेला व ताे सिमेंट राेडवर आदळला. यात त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली हाेती. शिवाय, तिघेही गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच हितेश बन्साेड यांनी घटनास्थळ गाठून चाैघांनाही जखमी अवस्थेत सावनेर येथील शासकीय रुग्णालयात आणले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती राेहितला मृत घाेषित केले, तर तिघांवर उपचार सुरू केले. याप्रकरणी खापा पाेलिसांनी ट्रॅक्टरचालकावरिुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
‘ताे’ ट्रॅक्टर रेती अथवा विटांचा
धडक देताच चालकाने ट्रॅक्टरसह बाेरुजवाडा (ता. सावनेर)च्या दिशेने पळ काढला. त्यामुळे खापा, सावनेर व केळवद पाेलिसांनी लगेच त्या ट्रॅक्टरचा शाेध सुरू केला. हा ट्रॅक्टर हिरव्या रंगाचा असून, त्यावर ताडपत्री बांधली आहे, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. हा ट्रॅक्टर खापा किंवा सावनेर शहरातील असल्याचेही तसेच ताे रेती अथवा विटांची वाहतूक करणारा असल्याचे त्यांनी सांगितले.