नागपूर : क्रिकेट विश्वातील पारंपरिक शत्रू मानल्या जाणारे भारत-पाकिस्तान क्रिकेट संघ रविवारी पुन्हा एकदा आशिया चषकासाठी एकमेकांशी झुंजले. प्रेक्षकांना शेवटपर्यंत रोमांचित करणाऱ्या या सामन्याने मध्य भारताचा बुकीबाजार शेवटच्या षटकापर्यंत कमालीचा गरम ठेवला. सूत्रांच्या माहितीनुसार, या एकट्या सामन्यावर नागपूरसह मध्य भारताच्या बुकीबाजारात १ हजार कोटींपेक्षा जास्तची लगवाडी खयवाडी झाली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांची कोणतीही शृंखला असू दे, बुकींसाठी ती पर्वणी असते. दुबई, गोवा, दिल्ली, मुंबई, छत्तीसगड, मध्य प्रदेशसह देशभरातील क्रिकेट नागपूर सेंटरवर खास नजर ठेवून असतात. येथील क्रिकेट बुकींच्या माध्यमातून होणारी हजारो कोटींची लगवाडी-खयवाडी त्यामागे आहे. नागपुरातील अनेक बुकी थेट दुबईतच कटिंग (स्वीकारलेल्या क्रिकेट सट्ट्यांची रक्कम (खयवाडी) दुबईतील बुकींकडे लावणे) करतात. त्यामुळे नागपूरच्या बुकींना देश-विदेशातील बुकी खास लाईन पुरवितात. आशिया चषक-टी-२० चा बिगुल वाजताच नागपूरचे बुकी अलर्ट मोडवर आले. अनेकांनी नागपूरच्या आजूबाजूची सुरक्षित ठिकाणं, विशिष्ट व्हॅन, वाहने, खास तयार करून घेतलेले मोबाईल ॲप सुरू केले अन् मध्य भारताचा सट्टा बाजार गरम केला.
भारत-पाकिस्तानची रविवारी मॅच सुरू होण्यापूर्वी ५०-५२ चा भाव खुलला. अर्थात भारत जिंकणार अशी भूमिका ठेवून १० हजार रुपयांचा सट्टा लावणाऱ्या सटोड्याला बुकींकडून ५ हजार मिळणार आणि पाकिस्तानवर ५२०० रुपये लावले तर त्याला १० हजार रुपये मिळणार होते. मात्र, मॅच सुरू झाल्यानंतर पहिल्या डावात या भावात कमालीची चढउतार झाली.
दुसऱ्या डावात खरी चढउतार
दुसरा डाव सुरू झाल्यानंतर सट्टा बाजारात कमालीचा चढउतार झाला. प्रारंभी बुकींकडून भारत जिंकणार, असे संकेत होते. नंतर मात्र पाकिस्तान जिंकणार असे संकेत असल्याने पाकिस्तानला ३० आणि नंतर २० चा (पाकिस्तानवर १० हजार लावल्यास आणि पाकिस्तान जिंकल्यास २ हजार रुपये मिळणार) रेट देण्यात आला. अखेर सटोड्यांना झुंजवत बुकींनी १ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची खयवाडी करून घेतली.
ती घडामोड ‘लक्षवेधी’
सामन्याची शेवटची तीन षटके शिल्लक असताना भारताची स्थिती कमकुवत असल्याचे पाहून बुकींनी पाकिस्तानला मॅच विनर म्हणून झुकते माप दिले. त्यामुळे मोठ्या सटोड्यांनी मोठी रिस्क घेत पाकिस्तानवर कोट्यवधींची लगवाडी केली अन् ते लंबेगार झाले. शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना भारतीय संघाच्या प्रमुखांकडून वारंवार पाण्याची बाटली, ग्लब्ज पोहोचवण्याच्या निमित्ताने फलंदाजांकडे निरोप पाठविला जात होता. ही घडामोड बुकी बाजारांसाठी लक्षवेधी होती.