आनंद डेकाटे नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रोजगार व प्रशिक्षण विभागामार्फत एचसीएल टेक्नॉलॉजीस कंपनीच्या वतीने मिहान येथे शनिवारपासून दोन दिवसीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. १३ व १४ मे रोजी सकाळी ८ वाजेपासून आयोजित रोजगार मेळाव्यात कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे.
कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. मिहान येथील एचसीएल टेक्नॉलॉजीस कंपनीकडून सर्व्हिस डेस्क ऍनालिस्ट या पदांकरिता मुलाखती घेतल्या जाणार आहे. या पदाकरिता २ वर्षाचा अनुभव असलेले किंवा कोणताही अनुभव नसलेले विद्यार्थी मुलाखतीस पात्र आहेत. कोणत्याही शाखेतील ६० टक्के पेक्षा जास्त गुण, बारावीमध्ये ६०टक्के पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. या पदाकरिता २.४० लाख इतके वार्षिक पॅकेज दिले जाणार आहे. २०२३ मध्ये किंवा पूर्वी पात्रता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोणत्याही प्रकारचा सक्रिय बॅकलॉग नसणे आवश्यक आहे.
मुलाखतीस येते वेळी दहावी, बारावी व पदवीच्या गुणपत्रिका, त्याचप्रमाणे निवासाचे शासनाने दिलेले कोणतेही ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. या मुलाखतीकरिता नोंदणी करता यावी म्हणून विद्यापीठाचे संकेतस्थळ तसेच समाज माध्यमांवर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्लॉट क्रमांक ५, सेक्टर -१२, मिहान सेझ नागपूर येथे आयोजित रोजगार मेळाव्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.