नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने (काव्य आणि मानसशास्त्र यांचा लपंडाव) 'मनाचिये द्वारी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात मिलिंद देशपांडे, डॉ. मिलिंद आपटे व लक्षती काजळकर यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
उद्घाटन या कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांची उपस्थिती होती. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून नातेसंबंधातील तसेच कौटुंबिक नात्यातील क्लिष्टता कशाप्रकारे सोडवायची याचे सादरीकरण 'मनाचिये द्वारी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले. मिलिंद देशपांडे यांनी कविता सादर करायची. लक्षिता काजळकर (भुसारी) यांनी प्रसंगानुरूप गायन करावे तर डॉ. मिलिंद आपटे यांनी परस्पर संबंधातील निर्माण झालेली क्लिष्टता मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सोडविण्याबाबत सल्ला द्यायचा, असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. पुरुष व स्त्री यांच्या तारुण्य ते वृद्धापकाळतील आयुष्यादरम्यान येणाऱ्या विविध प्रसंगाचे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सुंदर असे विवेचन या कार्यक्रमातून करण्यात आले. प्रेम विवाह झालेल्या तरुण-तरुणी दरम्यान लग्नापूर्वी चांगला सुसंवाद राहतो. मात्र, लग्न झाल्यानंतर त्यांच्या दरम्यान गैरसमज निर्माण होतात. त्याचप्रमाणे समाजातील वाढती घटस्फोटाची प्रकरणे लक्षात घेता पती-पत्नी दोघांनाही योग्य समुपदेशनाची गरज असल्याचे कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. आपटे यांनी निदर्शनास आणून दिले.
मुलांची जडणघडण करताना योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आई-वडिलांवर असते. मात्र, त्यांच्याच दरम्यान वाद होत असेल तर मुलांवर काय संस्कार होणार याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रास्ताविक शिरीष वैद्य यांनी केले. कार्यक्रमाला परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, शताब्दी महोत्सव कक्षाचे विशेष कार्य अधिकारी प्रदीप बिनीवाले यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.