हिंगणा (नागपूर) : वेगात जाणारे वाहन राेड ओलांडणाऱ्या रानडुकरांच्या कळपात शिरले. यात त्या वाहनाने १४ रानडुकरांना चिरडले असून, जखमी झालेली काही रानडुकरे पळून गेली. ही घटना हिंगणा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावरील आजनगाव (ता. हिंगणा) शिवारात साेमवारी (दि. ९) मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.
समृद्धी महामार्गावर गस्तीवर असलेल्या वाहतूक सुरक्षा पाेलिसांच्या पथकाला आजनगाव शिवारात हा प्रकार दिसला. या पथकातील बाळू मोरे, हरिसिंग ठाकूर, लक्ष्मण बनणे व महेंद्रसिंग गौर यांनी बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण)चे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एन. वाडे यांना सूचना दिली. त्यामुळे पी. एन. वाडे यांच्यासह वनरक्षक डी. एस. गीते, नीलेश नवले, जनार्दन लोणारे, वनमजूर बी. एल. हट्टेवार, सोमेश्वर तुरपकार, रत्नाकर चाके यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.
वन कर्मचाऱ्यांनी लगेच पंचनामा करून मृत रानडुकरे व त्यांच्या रक्त, मांसाचे तुकडे राेडवरून बाजूला केले. माहिती मिळताच खुर्सापार पाेलिस मदत केंद्र व या महामार्गावरील वायफळ टोल नाक्याचे चेकपोस्ट कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले हाेते. पाेलिस कर्मचाऱ्यांनी कडाक्याच्या थंडीत या महामार्गावर कुठेही वाहतूक काेंडी हाेणार नाही, याची दक्षता घेत उपाययाेजना केल्या. रानडुकरांना धडक देणारे वाहन कुठेही न थांबता सरळ निघून गेले हाेते. त्यामुळे त्या वाहनाचा अद्याप थांगपत्ता लागला नाही.
वन्यप्राण्यांसाठी ओव्हरब्रिज
आजनगाव शिवारात समृद्धी महामार्गाच्या दाेन्ही बाजूंनी जंगल असून, या जंगलात वाघासह इतर वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. त्या प्राण्यांना राेड ओलांडता यावा यासाठी आजनगाव शिवारात उंच ओव्हरब्रिज तयार केला आहे. शिवाय, महामार्गाच्या दाेन्ही बाजूला उंच टिनपत्रेही लावले आहेत. मात्र, वन्यप्राण्यांना त्या ओव्हरब्रिजवरून महामार्ग ओलांडणे शक्य हाेत नाही.
वन्यप्राण्यांमुळे अपघात वाढले
आजनगाव शिवारातील समृद्धी महामार्गावर आजवर अनेक अपघात झाले आहेत. यातील बहुतांश अपघात महामार्ग ओलांडणाऱ्या वन्यप्राण्यांमुळे झाले आहेत. महामार्गालगत दाेन्ही बाजूंनी झाडे असल्याने झाडांवरील माकडे धावत्या कारसह इतर वाहनांवर व वाहनांच्या दिशेने उड्या मारत असल्यानेही अपघात हाेत आहेत. मात्र, वनविभाग काहीही उपाययाेजना करायला तयार नाही.