नागपूर : शेतात चणा पिकाची कापणी करताना जमिनीत पुरून ठेवण्यात आलेल्या गावठी बॉम्बचा (बारुचा गोळा) स्फोट झाला. यात दोन महिला मजुरांसह एक लहान मुलगा जखमी झाला. कुही तालुक्यातील ससेगाव शिवारात बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पंचफुला जाधव (३०), मनीषा वाघोडे (२५) व विक्रम सोनवणे (१०, रा. गोपाळटोळी, ससेगाव) अशी जखमींची नावे आहेत.
करीना दिलीप सोनवाने (१६, रा. गोपाळटोळी, ससेगाव) हिने कुही पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ससेगाव येथील गोपाळ टोळीतील महिला मजूर बुधवारी कैलास ठवकर यांच्या शेतात चणा कापण्यासाठी गेल्या होत्या. चणा कापणी करीत असताना शेतात असलेल्या गावठी बारुद गोळ्यावर विळ्याचा धक्का लागल्याने स्फोट झाला.
या स्फोटात उपरोक्त तिघे जखमी झाले. त्यावेळी शेतात सुमन सोनवणे, पंचफुला जाधव, मीना जाधव, मनीषा वाघोडे, राजविकास वाघोडे व विक्रम सोनवणे होते. पंचफुला जाधव व मनीषा वाघोडे या दोघी शेताच्या डाव्या बाजूला चणा कापत होत्या. विक्रम हा त्यांच्या जवळ उभा होता. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास विक्रमला शेतात काळ्या रंगाचा दगडासारखा गोळा दिसला. तो पाहण्यासाठी पंचफुला जाधव व मनीषा वाघोडे तेथे आल्या. पाहत असताना पंचफुला हिच्या हातातील विळा गोळ्याला लागल्याने स्फोट झाला.
शेतातील माती पंचफुला, मनीषा व विक्रमच्या डोळ्यात गेल्याने त्यांना काहीही दिसत नव्हते. स्फोटाचा आवाज ऐकून शेतमालक कैलास ठवकर तेथे आला. त्याने लागलीच तिघांनाही कुही येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर तिघांनाही पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी कुही पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भांदवि कलम ३३७, २८६ गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने, हेडकॉन्स्टेबल विजय कुमरे करीत आहे.
कुणी ठेवला गावठी बॉम्ब?
चण्याच्या शेतात गावठी बॉम्ब (बारुदचा गोळा) कुणी ठेवला याचा अद्याप शोध लागलेला नाही. जंगली डुक्कर मारण्याच्या उद्देशाने कुणीतरी हा गोळा शेतात ठेवला, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.