नागपूर : गुरुवार ७ सप्टेंबर हा दिवस जगभरात ‘इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्काईज’ म्हणून जगभरात साजरा केला जात आहे. येणाऱ्या पिढ्यांना प्रदूषणमुक्त स्वच्छ निळे आकाश पाहता यावे म्हणून राष्ट्रीय स्तरावर अनेक संस्था सरसावल्या असून ८०० हून अधिक जागरूक नागरिकांनी सोशल प्लॅटफार्मवर आभासी मानवी साखळी तयार केली आहे.
दर दिवशी वाढणारे प्रदूषण हा सर्वांसाठी अतिशय चिंतेचा विषय ठरला आहे. राज्यात मुंबई, पुणे, नागपूरसह बहुतेक शहरे प्रदूषणाच्या गंभीर समस्येला तोंड देत आहेत. ही समस्या दिवसागणिक भयावह हाेत आहे. हवा प्रदूषण कसलाच भेदभाव करत नाही, त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारावी व श्वसनासाठी स्वच्छ हवा मिळावी यासाठी ‘क्लीन एअर कलेक्टिव्ह’च्या पुढाकाराने हे अभियान राबविण्यात आले आहे.
हवा प्रदूषणाबाबत जागरुक देशभरातील नागरिकांचा यामध्ये सहभाग आहे. नागरिकांनी या उपक्रमामध्ये एका खास वेबसाईटवर आपली सेल्फी अपलोड केली आहे. या व्हर्च्युअल ह्यूमन चेनला संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या भारतीय सदिच्छादूत अभिनेत्री दिया मिर्झा व इतर दिग्गजांनी पाठिंबा दर्शविला आहे. टूगेदरफॉरक्लीनएअर हा हॅशटॅग वापरुन आठशेहून अधिक नागरिकांच्या सहभागाने ही आभासी मानवी साखळी आकारास आली आहे. या अभियानात चर्चासत्रे, जनजागृती कार्यक्रम, क्लीन एअर वॉक यासारखे उपक्रम केले जात आहेत. नागपुरातील अनेक शाळांनीही यात सहभाग नोंदविला आहे. महानगरपालिकेची विवेकानंद शाळा तसेच महाल येथील पितळे शास्त्री शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती अभियानासाठी पुढाकार घेतला आहे.
लहान मुलं ही हवा प्रदूषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत खूपच संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांना ही समस्या माहीत होणे महत्वाचे आहे. मुलांमध्ये याबाबत जागृती झाली की आपोआपच त्याचा परिणाम पालकांवर दिसून येईल. अभियानाअंतर्गत मुलांसाठी आम्ही जागरुकता मोहिम राबवली. त्याचा त्यांना फायदा झाला असून, हवा प्रदूषणाबाबत यापुढेही त्यांच्यासोबत संवाद साधत राहण्याची योजना आम्ही आखली आहे.
- संध्या भगत, शिक्षिक, विवेकानंद शाळा