नागपूर : हत्या आणि मकोकाच्या गुन्ह्यात अडीच वर्षांपासून ‘वॉन्टेड’ असलेला सराईत गुन्हेगार ‘डिजिटल पेमेंट’मुळे पोलिसांच्या ताब्यात आला आहे. गुन्हे शाखेने त्याला मुंबईतून अटक केली आहे. सोमेश ऊर्फ सोनू बिरसिंग बिलोरिया (२७, रा. गंगाबाग, पारडी) असे गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्यावर खुनासह सात गुन्हे दाखल आहेत.
जुन्या वैमनस्यातून सोनूने २७ नोव्हेंबर २०१९ रोजी आपल्या साथीदारांच्या मदतीने मोहनीश भगवान ठाकरे (२५, रा. शिवनगर) यांचे अपहरण करून हत्या केली होती. टाइल्स कारागीर मोहनीश घरातून फिरायला निघाले होते. त्यानंतर ते परतलाच नव्हता. पारडी पोलिसांनी हरवल्याची नोंद करून तपास सुरू केला. मोहनीशचा खून सोनू बिलोरिया, त्याचा साथीदार अक्षय गजानन येवले (२५), नीलेश ऊर्फ नीलू दयाराम आगरे (१९) आणि अमोल उर्फ विकी शिवानंद हिरापुरे (२७, रा. भवानीनगर) यांनी केल्याची बाब तपासादरम्यान उघडकीस आली होती. त्यानंतर सोनू फरार झाला होता. सोनू आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. दरम्यान, पोलिसांपासून वाचण्यासाठी सोनू गुजरातला पळून गेला.
नुकतेच पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यांना फरार गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले. गुन्हे शाखेच्या युनिट-५ ने सोनूचा गुजरातमध्ये शोध सुरू केला. त्यांना सोनूचा मोबाईल नंबर मिळाला. त्याच याच नंबरवरून पेटीएम अकाउंटही होतं. याचा तपास केला असता सोनू मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. युनिट पाचने मुंबईत छापा टाकला व वर्सोवा येथे सोनूला ताब्यात घेण्यात आले. त्याला नागपुरात आणून पारडी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई पोलीस निरीक्षक मुकुंदा साळुंके, एपीआय संकेत चौधरी, पीएसआय संतोष इंगळे, बलराम झाडोकर, दीपक कारोकार, दिनेश चाफेकर, अनिल बावणे, पुरुषोत्तम सुनकिनवार, चंदू ठाकरे, आनंद यादव, उत्कर्ष राऊत, मिथुन नाईक, पराग डोक, चंद्रशेखर राघोर्ते आणि नासीर शेख यांनी कारवाई केली.