नागपूर : गुजरातमधील विद्यार्थ्याने पाणी शोषून घेणारा रोड तयार केला आहे. त्याने हा प्रयोग चिल्ड्रन सायन्स काँग्रेसमध्ये सादर केला आहे. हा प्रयोग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
धामेलिया पिशून असे विद्यार्थ्याचे नाव असून तो सूरतमधील आशादीप उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेत आहे. धामेलियाला रोड बांधकामात रुची आहे. गेल्या पावसाळ्यात त्याला रोडवर साचणाऱ्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावत असल्याचे आणि अपघात होत असल्याचे दिसून आले. परिणामी, त्याने पाणी शोषून घेणारा रोड तयार करण्याचा निर्धार केला व त्याकरिता आवश्यक संशोधन केले. दोन महिन्यांपूर्वी त्याला असा रोड तयार करण्यात यश मिळाले. या रोडच्या तळाशी बारीक गिट्टी टाकली जाते. त्यानंतर दुसऱ्या स्तरात मोठी बजरी, तिसऱ्या स्तरात मध्यम आकाराची गिट्टी तर, चौथ्या स्तरात बारीक बजरी टाकली जाते. शेवटी बारीक बजरी व डांबरचा थर लावला जातो. हा रोड जाळीदार होतो. त्यामुळे पाणी शोषून जमिनीत मुरते. परिणामी, भूजल पातळीतही वाढ होते. ही बाब लक्षात घेता सरकारने देशभरात असे रोड तयार करावे, अशी मागणी धामेलियाने यावेळी केली.