नागपूर : ‘नारी न्याय आंदोलन’ करण्याची घोषणा करणाऱ्या प्रदेश महिला काँग्रेसच्या लाडक्या बहिणींमध्येच आंदोलनाच्या पूर्वसंध्येला मतभेदांचा खडा पडला. या आंदोलनाची माहिती देण्यासाठी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी पत्रकार क्लबमध्ये बुधवारी पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद संपतानाच महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष नंदा पराते तेथे पोहचल्या. नागपुरात हे आंदोलन होत असताना आपल्याला डावलून सर्व आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यात येत आहे. आपल्याला माहिती देण्यासही टाळाटाळ केली जात असून आपल्याला का डावलण्यात येत आहे, असा सवाल करीत पराते यांनी राडा घातला.
नागपुरात गुरुवारी, २९ ऑगस्ट रोजी संविधान चौकात सकाळी ११ वाजता महिला कॉंग्रेसचे आंदोलन होत आहे. प्रदेश अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यावेळी शहरातील महिला पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित दिसत नाही, याकडे पत्रकारांनी सव्वालाखे यांचे लक्ष वेधले. यावर मोठे आंदोलन असल्यामुळे सर्व पदाधिकारी कामात व्यस्त असल्याचे सव्वालाखे यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेनंतर सव्वालाखे यांच्यासह सर्व महिला पदाधिकारी जाण्यास निघाल्या. तेवढ्यात शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष नंदा पराते प्रेस क्लबमध्ये पोहोचल्या. शहर अध्यक्ष झाल्यापासून प्रत्येक कार्यक्रमात आपल्याला डावलण्यात येत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागपुरात एवढे मोठे आंदोलन असूनही आपल्याला कुठलीही माहिती देण्यात टाळाटाळ करण्यात येत आहे. महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अल्का लांबा कधी येणार आहेत, हे विचारण्यासाठी आपण तीन वेळा फोन केले, पण उत्तर मिळाले नाही. पत्रकार परिषदेबद्दलही कोणीच काही सांगितले नाही. एवढेच काय तर गुरुवारी होणाऱ्या आंदोलनात स्टेज कमिटीमध्ये माझ्यासह एकाही नागपूरच्या महिलेचा समावेश करण्यात आला नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. परातेंची बाजू ऐकल्यानंतर पत्रकारांनी सव्वालाखे यांना विचारना केली असता त्यांनी नंदा परातेंसोबत ‘मीस कम्युनिकेशन’ झाल्याचे उत्तर दिले. पत्रकार परिषदेला जि.प.च्या माजी अध्यक्ष सुनिता गावंडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कुंदा राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल कोटेचा उपस्थित होते.
आज ‘नारी न्याय आंदोलन’आंदोलन
महिलांच्या मतांवर डोळा ठेऊन भाजप सरकारने महिलांना लोकसभा, विधानसभेत ३३ टक्के आरक्षण लागू केले. मात्र त्याची अंमलबजावणी सुरु केलेली नाही. महिलांना लोकसभा, विधानसभेत ३३ टक्के आरक्षण मिळावे ही राहुल गांधींची संकल्पना आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. या मुद्यांवर आवाज उठविण्यासाठी हे आंदोलन होत असल्याचे संध्या सव्वालाखे यांनी सांगितले. या आंदोलनात महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील. महिलांनी लाल वस्त्र धारण करून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.