नागपूर : आम्ही वर्षावर राहायला उशिरा गेलो. आधी म्हटलं तिथे जे असेल ते आधी काढा...पाटीभर लिंब सापडली, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. तसेच, विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी या भाषणामध्ये आपल्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
"आम्ही रेशीमबागेत गेलो, आम्ही गोविंदबागेत गेलो नाही. सहन करण्याची मर्यादा असते. जे प्रबोधनकारांचे वारसदार आहेत ते लिंबू फिरवण्याची भाषा करत आहेत. प्रबोधनकारांच्या विचारांना तिलांजली दिली. आम्ही वर्षावर राहायला उशीरा गेलो. आधी म्हटलं तिथे जे असेल ते आधी काढा... पाटीभर लिंब सापडली. कोणाला बोलताय? ज्यांना तुमची अंडी पिल्ली माहितीयेत. हिंमत असेल तर मैदानात लढा असं म्हणत आहेत. जे घरातून बाहेरच पडत नाहीत ते हिंमतीची भाषा करतात हा मोठा विनोद आहे. बाळासाहेब पाठीशी उभे राहायचे. तुम लढो, हम कपडे संभालते हे, अशा स्वभावाचे ते नव्हते", असे एकनाथ शिंदे म्हणाले.
याचबरोबर, "अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा अन् बक्षीस मिळवा, म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलून टाकला", अशा शब्दात उद्धव ठाकरेंना टोला लगावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्लोबोल केला. एकनाथ शिंदे म्हणाले की, अडीच वर्षात तुम्ही विदर्भासाठी कोणता निर्णय घेतला. विदर्भातील शेतकरी चांगल्या गाडीतून फिरला पाहिजे. विमानातून शेतकरी फिरला पाहिजे. तालुक्यांत विमानतळ सुरु करतोय. मुख्यमंत्री कसा हेलिकॉप्टरने शेतावर जातो म्हणून हिणवलं. दुसरा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाणारा दाखवा आणि बक्षिस मिळवा असं म्हटले. मी तर म्हणतो मागचे मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडले हे दाखवा आणि बक्षीस मिळवा, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारने धान उत्पादकांना प्रती हेक्टर मदत करण्याचा मोठा निर्णय घेतल्याचा पुन्हा उल्लेख केला. राज्यातून उद्योग जाण्याला आमचं सरकार कारणीभूत नाही याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. सरकार बदललं नसतं तर विदर्भात अजूनही अधिवेशन झालं नसतं, असंही ते म्हणाले. अडीच वर्षांत विदर्भासाठी कोणता निर्णय घेतलात असा प्रश्नही त्यांनी विरोधकांना विचारला. तसेच, ते म्हणाले, "आम्ही 70 हजार कोटींच्या गुंतवणूकीचे प्रकल्प मंजूर केले. त्यापैकी 44 हजार कोटींचे प्रकल्प फक्त विदर्भातील आहेत. एनडीआरएफचे नॉर्मस् बदलून आम्ही शेतकर्यांना मदत केली."
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्मृतिमंदिराला भेट दिली. यावरून मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. आरएसएसच्या कार्यालयात गेलेत मग आता त्या कार्यालयावरही दावा करणार का? आता सरसंघचालक मोहन भागवतांनी कार्यालयाचे कोपरे तपासून पाहावेत कारण, जे भेट घ्यायला आले, होते ते कुठं लिंबू-मिरच्या-टाचण्या टाकून तर गेले नाहीत ना, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती.