नागपूर : शालेय साहित्य व किराणा खरेदी करण्यासाठी मुलाला साेबत घेऊन जात असलेल्या वडिलांच्या माेटारसायकलला रानडुकराने जाेरात धडक दिली. त्यात दाेघेही गंभीर जखमी झाले. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काचूरवाही शिवारात शनिवारी (दि. १) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.
धनराज लिल्हारे (वय ४०) व कृष्णा धनराज लिल्हारे (१३, रा. हाताेडी (टाेला), ता. रामटेक )अशी जखमींची नावे आहे. धनराज हाताेडी (टाेला) येथील राईस मिलमध्ये कामगार म्हणून काम करताे. मुलासाठी शालेय साहित्य व घरच्यासाठी किराणा खरेदी करावयाचा असल्याने ताे कृष्णाला साेबत घेऊन माेटारसायकलने काचूरवाही (ता. रामटेक) येथे जात हाेता.
ताे काचूरवाही शिवारात पाेहाेचताच आठ ते दहा रानडुकरांचा कळप त्याच्या माेटारसायकलला आडवा आला. त्यातच एका रानडुकराने त्याच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यामुळे दाेघेही रस्त्यावर काेसळले. यात धनराजच्या छातीची बरगडी फ्रॅक्चर झाली असून, त्याच्या डाेक्याला गंभीर जखम झाली. शिवाय, कृष्णालाही दुखापत झाली. त्या दाेघांवर रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त कराकाचूरवाही परिसरात वन्यप्राण्यांची संख्या बरीच वाढली असून, ते पिकांची प्रचंड नासाडी करतात. आता हेच वन्यप्राणी हल्ले चढवत असून, अपघातांना कारणीभूत ठरत असल्याने नागरिकांच्या जिवावर उठले आहेत. त्यामुळे वन विभागाने या भागातील सर्व वन्यप्राण्यांचा कायमचा बंदाेबस्त करावा, तसेच धनराज लिल्हारे याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी जगदीश हिवसे, पंकज पिसे, मधुकर पिसे, रामलाल उईके, पांडुरंग हुड यांच्यासह काचूरवाही येथील शेतकऱ्यांनी केली आहे.