नरखेड (नागपूर) : पॉक्साेअंतर्गत न्यायालयात खटला सुरू असताना पॉक्साेच्या आराेपीने साक्षीदारावर त्याची साक्ष बदलण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. यासंदर्भात गावातील प्रतिष्ठीत नागरिकांची बैठकही झाली. परंतु, आधीचा अनुभव लक्षात घेता साक्षीदाराने साक्ष बदलण्यास स्पष्ट नकार दिला. त्यात साेमवारी (दि. १२) रात्री ७ वाजताच्या सुमारास बेलाेना येथील बसस्टाॅपजवळ साक्षीदाराचा खून करण्यात आला. या प्रकरणात एका संशयितास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांनी दिली.
केशव बाबुराव मस्के, रा. बेलाेना, ता. नरखेड असे मृताचे नाव आहे. नरखेड पाेलिसांनी तीन वर्षापूर्वी आदिवासी समाजातील मुलीवर अत्याचारप्रकरणी प्रेमराज कळंबे, रा. बेलाेना, ता. नरखेड याला पॉक्साेअंतर्गत अटक केली हाेती. त्या प्रकरणात केशवची साक्ष हाेती. केशवने त्याची साक्ष बदलावी व प्रकरण मिटवावे यासाठी प्रेमराज आग्रही हाेता. त्यासाठी प्रेमराज त्याच्यावर वारंवार दबाव आणण्याचा प्रयत्न करीत हाेता. प्रेमराजचा वाईट अनुभव आल्याने केशव साक्ष बदलण्यास नकार देत हाेता.
काही दिवसांपूर्वी या प्रकरणात ताेडगा काढण्यासाठी बेलाेना येथील बजरंगबलीच्या मंदिरात शनिवारी (दि. १०) गावातील प्रतिष्ठीत नागरिकांची बैठक झाली. त्या बैठकीतही केशवने साक्ष बदलण्यास स्पष्ट नकार दिला हाेता. त्याचवेळी प्रेमराजचा लहान भाऊ भारत कळंबे याने त्याला जीवानिशी मारण्याची धमकीही दिली हाेती. केशव साेमवारी रात्री शेतातून घरी परत येत असताना प्रेमराजने त्याला बेलाेना येथील बसस्टाॅपजळ अडवले व त्याचा खून केला. पाेलिसांनी माेवाड-जलालखेडा राेडवर नाकाबंदी करून भारत कळंबे याला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
डाेक्यावर झाडली गाेळी
मृत केशवच्या डाेक्यावर मागच्या भागाला जखम वगळता शरीरावर इतरत्र जखमी नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. त्याचा खून डाेक्यावर माऊझरने गाेळी झाडून गेल्याची माहिती जाणकारांनी दिली. पाेलिसांनी घटनास्थळाहून बुलेट कॅप जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, पाेलिसांनी दुजाेरा दिला नाही. भारत कळंबे हा मिलिटरीत असून, ताे सध्या सुट्यांवर गावी आला आहे.
केशवच्या मुलास फसवण्याचा प्रयत्न
केशव साक्ष बदलण्यास तयार नसल्याने प्रेमराजने केशवचा मुलगा निखील याच्या विराेधात काही महिन्यांपूर्वी पाेलिसात तक्रार दाखल केली हाेती. त्या तक्रारीच्या आधारे पाेलिसांनी निखीलविरुद्ध पॉक्साेअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली हाेती. त्याच्यावर चार वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याचा आराेप लावण्यात आला हाेता. त्यामुळे केशव त्याची साक्ष बदलण्यास वारंवार नकार देत हाेता.