नागपूर : जयप्रकाशनगर चौकात सिमेंट मिक्सरखाली चिरडून रेल्वे तिकीट चेकरच्या पत्नीचा मृत्यू झाला. सुनीता बी.रमणाकर नायडू (५३) असे मृत महिलेचे नाव असून त्या मुलीला ट्यूशनला सोडून घराकडे परतत होत्या. या अपघातानंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. राणाप्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.
नरेंद्रनगर येथील राजविला अपार्टमेंट येथील निवासी असलेल्या सुनीता यांची १६ वर्षी मुलगी ही दररोज खामला येथे नीटच्या कोचिंगसाठी जाते. सकाळी सुनीता याच तिला सोडून द्यायच्या. नेहमीप्रमाणे त्यांनी मुलीला ट्यूशनला सोडले व त्या पावणेनऊ वाजताच्या सुमारास घरी परतत असताना जयप्रकाशनगर चौकात एमएच ४६- एफ ३१७३ या क्रमांकाची सिमेंट मिक्सर गाडी वेगाने आली व सुनीता यांच्या दुचाकीला धडक मारली. यात सुनीता गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर चालक गाडी सोडून पळून गेला. सुनीता यांना घटनास्थळावरील लोकांनी मेडिकल इस्पितळात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघाताची माहिती त्यांचे पती बी. रमनाकर कृष्णराव नायडू यांना देण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वाहन चालकाविरोधात गुन्हा नोेंदविला असून त्याचा शोध सुरू आहे.
मुलगी नीटची करीत आहे तयारी, स्वप्न अधुरेच राहिले
सुनीता यांचा त्यांच्या मुलीवर फार जीव होता. मुलगी हुशार असल्याने ती डॉक्टर व्हावी असे त्यांचे स्वप्न होते. नीटच्या तयारीसाठी मुलगी लागली होती व तिच्या अभ्यासासाठी त्या हरतऱ्हेने मदत करायच्या. या अपघातामुळे त्यांच्या मुलीला मोठा धक्का बसला आहे.