योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: चोरट्यांची भिती दाखवत भर बाजारात एका महिलेचे १.६० लाखांचे दागिने हातचलाखी दाखवत लंपास करण्यात आले. इतवारी परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलेसोबत ही घटना घडली. कुसुम त्र्यंबकराव जांभळे (५८, सुभाषनगर) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.
मंगळवारी दुपारच्या सुमारास त्या इतवारीत खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यांना तेथे दोन अनोळखी महिला भेटल्या व त्यांनी दुकानाबाबत विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यास सुरुवात केली. बोलता बोलता त्या कुसुम यांना मारवाडी चौक ते जुना मोटारस्टॅंडदरम्यानच्या एका गल्लीत घेऊन गेला. तेथे त्यांचा एक पुरुष सहकारी आला व चोरट्यांची भिती आहे असे सांगत महिलांजवळील एक कागदांचे बंडल बाहेर काढले. ते बंडल नोटांचे असल्याचे भासवत त्याने ते एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीत ठेवले. त्याने कुसुम यांनादेखील त्यांच्या सोन्याच्या दोन बांगड्या, मंगळसूत्र व कर्णफुले रुमालात ठेवण्यास सांगितले. रुमालातील ते दागिने पिशवीत ठेवण्याचा बनावदेखील केला. मात्र हातचलाखी करत ते दागिने लंपास करण्यात आले. ते गेल्यानंतर कुसुम यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.