नागपूर : रिफ्लेक्टर नसतानादेखील बेजबाबदारपणे रस्त्यावर उभ्या केलेल्या ट्रकवर धडकून एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाचे दोन वर्षांअगोदरच लग्न झाले होते व त्याला एक वर्षांचा मुलगा आहे. बायको-पोराला भेटून परत निघाल्यावर काही वेळातच त्याचा अपघात झाला.पोलिसांनी या प्रकरणात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.
धम्मदास सुधाकर गजभिये (३२, डोंगरगाव) असे मृतकाचे नाव आहे. तो एका खासगी कंपनीत नोकरीला होता. धम्मदास रविवारी दिवसभर कामावर होता व सायंकाळी रविवारी सासुरवाडीत पत्नी व मुलाला भेटायला गेला होता. तेथून रात्री आठनंतर तो घरी जाण्यासाठी निघाला.
वर्धा मार्गावरील परसोडी गावाजवळून दुचाकीने जात असताना रस्त्यात एमएच ०६ एक्यू ००९८ हा ट्रक रस्त्यात उभा होता. ट्रकला रिफ्लेक्टर नव्हते व पार्किंग लाईटदेखील लावलेले नव्हते. धम्मदासला ट्रक न दिसल्याने तो त्यावर धडकला. यात गंभीर जखमी झाला. घटनास्थळावरील नागरिकांनी त्याला एम्समध्ये उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.