नागपूर : जुन्या वादातून एका तरुणाने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला एखादा चित्रपटातील सीनप्रमाणे पाठलाग करून थांबवले व त्यानंतर मित्राच्या मदतीने त्याच्यावर चाकूने वार करत जखमी केले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सुभाषसिंह रुद्रसिंह चौहान (४२, दुर्गानगर, भरतवाडा) असे जखमीचे नाव आहे. ते एका दालमिलमध्ये काम करतात. रविवारी काम आटोपून रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घरी परत येत असताना शेजारी राहणाऱ्या अमन रतन खांडेकर (२५) व त्याचा मित्र अभिषेक विनेश कांबळे (२९, बन्सीनगर) यांनी त्यांचा पाठलाग केला. एका कच्च्या रस्त्यावर त्यांच्या दुचाकीसमोर आपली दुचाकी उभी करत त्यांना थांबविले. सुभाषसिंह यांचा अमनसोबत दोन वर्षांअगोदर वाद झाला होता व तो मुद्दा अमनने उकरून काढला. काही कळायच्या आतच अभिषेकने सुभाषसिंह यांना पकडले व अमनने खिशातून चाकू काढत त्यांच्यावर वार केले. त्याने त्यांचा चेहरा, नाक, हातावर वार केले. ते रक्तबंबाळ झाल्याचे पाहून आरोपी तेथून पळून गेले.
सुभाषसिंह यांनी पत्नीला फोन करून घटनास्थळावर बोलवून घेतले. त्याच अवस्थेत त्यांना ते कळमना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी एका खासगी इस्पितळात दाखल केले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमन व अभिषेकविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.