खापरखेडा (नागपूर) : एकाच कुटुंबातील दोन गटात असलेला संपत्तीचा वाद विकोपास गेल्याने आधी त्यांच्यात हाणामारी झाली. ते प्रकरण मिटत नाही तोच त्याच कुटंबातील एका सदस्याची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, मारेकऱ्याने पोलिसांसमोर समर्पण केले असून, तो त्या कुटुंबाचा सदस्य नाही.
ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-सावनेर महामार्गावरील दहेगाव (रंगारी) नजीकच्या किल्ले कोलारजवळ बुधवारी (दि. १९) मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.निखिल अशोक पासवान (२७, रा. दहेगाव रंगारी, ता. सावनेर) असे मृताचे तर राहुल राजन सूर्यवंशी (२४, रा. सिल्लेवाडा, ता. सावनेर) अटकेतील आरोपीचे नाव आहे.
पासवान कुटुंबीय मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. अजित पावसान, रा. सिल्लेवाडा व सुजित पासवान, रा. चनकापूर हे दोघेही अशोक पासवान यांचे मामेभाऊ होत. अजित व सुजित यांच्या वडिलांची चनकापूर येथे स्थावर संपत्ती असून, याच संपत्तीच्या वाटणीवरून या दोघांसह त्यांचे आई, वडील व बहिणींमध्ये वाद निर्माण झाला आहे. या वादात निखिल व अशोक यांनी अजितची बाजू घेतली. काही दिवसांपूर्वी या दोन्ही गटात हाणामारी झाल्याने प्रकरण पोलिसात पोहोचले होते. त्यामुळे सुजित व त्याच्या बहिणींच्या मनात निखिल व अशोकविषयी राग होता.
दरम्यान, भांडणातून निखिलचा खून करण्यात आल्याची माहिती त्याच्या वडिलांना मिळाली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तक्रार नोंदविण्यासाठी पोलिस ठाणे गाठले असता, निखिलचा खून राहुलने केल्याचे त्यांना सांगण्यात आले. राहुल त्यावेळी पोलिस ठाण्यात बसून होता. त्याने निखिलच्या मान व गळ्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार (प्रभारी) दीपक कांक्रेडवार करीत आहेत.
दोघेही दुचाकीवर सोबत आले
निखिल हा कोराडी परिसरातील कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरी करायचा. राहुल हा पासवान कुटुंबातील एका तरुणीचा प्रियकर असल्याने दोघांची आपसात चांगली ओळख होती. दोघेही कोराडी येथे सोबत दारू प्यायले आणि दहेगाव (रंगारी)च्या दिशेने निघाले. किल्ले कोलार परिसरात राहुलने निखिलला दुचाकी थांबविण्याची सूचना केली. त्याने दुचाकी थांबविताच राहुलने त्याच्या मान व गळ्यावर चाकूने वार केले. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्याची दुचाकी सुरूच होती.
आरोपीच्या मनातील राग
काही वर्षांपूर्वी निखिलचा काका व राहुलची काकू दोघेही मध्य प्रदेशात पळून गेले होते. त्यानंतर काकूने आत्महत्या केली. पासवान कुटुंबीयांमध्ये काही दिवसांपूर्वी हाणामारी झाली होती. त्यात निखिल त्याच्याच कुटुंबातील तरुणीच्या कानशीलात हाणली होती. ती तरुणी राहुलची प्रेयसी होय. या दोन घटनांमुळे राहुलच्या मनात निखिलविषयी राग होता. याप्रकरणात आरोपींची संख्या अधिक असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत.