नागपूर: आपसी वाद विकाेपाला गेला आणि एकाने रविवारी (दि. ५) रात्री ११ वाजताच्या सुमारास तरुणाच्या छातीवर चाकूने वार केले. त्या जखमी तरुणाचा साेमवारी (दि. ६) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कन्हान (ता. पारशिवनी) शहरात हाेळीच्या सणाला गालबाेट लागले. आराेपीला अटक करण्यात आल्याची माहिती पाेलिस अधिकाऱ्यांनी दिली.
सागर कालीचरण यादव (२५, रा. हरिहरनगर, कांद्री-कन्हान, ता. पारशिवनी) असे मृताचे, तर योगेश संजय राईकवार (३३, रा. डाॅ. आंबेडकर चौक, कन्हान, ता. पारशिवनी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. दाेघांची आपसात ओळख असून, त्यांच्यात किरकाेळ कारणावरून भांडणही हाेते. दाेघांचीही रविवारी रात्री डाॅ. आंबेडकर चाैकातील एटीएमजवळ भेट झाली आणि पुन्हा भांडण सुरू झाले. त्यातच याेगेशने चाकू काढून सागरच्या छातीवर वार करायला सुरुवात केली.
स्वत:ला वाचविण्यासाठी सागर जखमी अवस्थेत पळू लागला. याेगेशने त्याचा पाठलाग केला; मात्र ताे हाती लागला नाही. काही दूर जाताच ताे काेसळला. नागरिकांनी या प्रकाराची माहिती लगेच पाेलिसांना दिली. पाेलिस निरीक्षक यशवंत कदम यांनी शाेध घेत त्याला कन्हान शहरातील प्राथमिक आराेग्य केंद्रात नेले. तिथे प्रथमाेपचार करून त्याला नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात भरती केले. तिथे साेमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी ताराबाई कालीचरण यादव, रा. हरिहरनगर, कांद्री-कन्हान यांच्या तक्रारीवरून गुन्हा नाेंदवून आराेपीस अटक केली.
कायदा, सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
गुन्हेगारीत वाढ झाल्याने संपूर्ण कन्हान शहर व परिसर अतिसंवेदनशील बनले आहे. काही दिवसांपूर्वी शहरात पाेलिस कर्मचाऱ्यांवर तलवारी उगारण्यात आल्या हाेत्या. या प्रकरणातील आराेपींच्या निरपराध भावाला पाेलिसांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनांची धग कायम असताना हाेळीच्या दिवशी शहरात पुन्हा तरुणाचा खून करण्यात आला. त्यामुळे शहरासह परिसराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.