नागपूर : युनिसेक्स सलूनच्या नावाने सेक्स रॅकेट चालणाऱ्या ‘बिग बॉस सलून’मध्ये गुरुवारी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) छापा घातला. येथे देहविक्रय करताना एक उच्चशिक्षित तरुणी पोलिसांच्या हाती लागली. तिच्यासह अनेकींकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या समीर कवडू श्रीवास (वय ३४) नामक आरोपीला पोलिसांनी अटक केली.
विनोबा भावे नगरात (यशोधरानगर) राहणारा समीर श्रीवास याने लकडगंजमध्ये बिग बॉसच्या नावाने सलून सुरू केले होते. येेथे येणाऱ्या ग्राहकांना तो महिला-मुली उपलब्ध करून देण्याची ऑफर देत होता. ही माहिती एसएसबीच्या पोलीस निरीक्षक कविता ईसारकर यांना मिळाली. त्यांनी गुरुवारी शहानिशा करून घेतल्यानंतर समीरकडे डमी ग्राहक पाठवला. या ग्राहकाकडून २ हजार रुपये घेऊन समीरने त्याला एक तरुणी शरीरसंबंधासाठी उपलब्ध करून दिली. ग्राहकाने तरुणीला रूममध्ये नेल्यानंतर काही वेळेतच पोलिसांनी बिग बॉसवर छापा मारला. समीरला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आक्षेपार्ह वस्तू तसेच मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरुणीची विचारपूस केल्यानंतर तिची सुटका करण्यात आली. गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित, सहायक आयुक्त रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कविता ईसारकर यांच्या नेतृत्वात हवालदार अनिल अंबादे, नायक राशीद शेख, शिपाई भूषण झाडे, मनीष रामटेके, रुबिना शेख आणि सुधीर तिवारी यांनी ही कारवाई केली.
फिफ्टी-फिफ्टीचा मामला
समीर गेल्या अनेक वर्षांपासून या गोरखधंद्यात सक्रिय असून वेश्याव्यवसाय करणाऱ्या अनेक महिला-मुलींची त्याच्याकडे यादी आहे. यातील काही जणी शानशोकीसाठी तर काही जणी आर्थिक लोभापोटी हा व्यवसाय करतात. गुरुवारी पोलिसांच्या हाती लागलेली तरुणी गरीब कुटुंबातील असून तिचे वडील आजारी आहेत. आई घरोघरी जाऊन महिलांची मालीश करते. ही तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. पैशाची कमतरता असल्याने ती या गोरखधंद्यात आली. आरोपी समीर तिला ग्राहकाकडून मिळालेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम देतो, अर्धी रक्कम तो ठेवतो.
----