लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे अनेकांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारीला घेऊन जुलै २०१७ मध्ये आधार संलग्न बायोमेट्रिक करण्याचा सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाने (डीएमईआर) सर्वच मेडिकलला दिल्या. परंतु आता वर्ष होत असतानाही राज्यभरातील २७ हजार डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांमधून केवळ ४,३८४ जणांनी बायोमेट्रिकशी आधार संलग्न केले आहे. धक्कादायक म्हणजे त्यातही केवळ १४३ जणच बायोमेट्रिकचा वापर करीत असल्याने आधार संलग्न बायोमेट्रिकला राज्यभरातून ‘ठेंगा’ दाखविला जात असल्याचे चित्र आहे. यात नागपूर मेयो, मेडिकलमधील केवळ एकेक जणाचा समावेश आहे.कामावर असूनही दांडी मारणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी बायोमेट्रिक सक्तीचे करण्यात आले. परंतु त्यानंतरही दांडी मारणाऱ्यांची संख्या कमी झाली नव्हती. परिणामी, आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या. यामुळे राज्यस्तरावर यावर नजर ठेवण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व मेडिकलच्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना आधार संलग्न बायोमेट्रिक करण्याच्या सूचना केल्या.याच्या कार्यपद्धतीची माहिती व्हावी यासाठी कार्यशाळाही घेतली. यातून सर्वांना प्रशिक्षण व माहिती देण्यात आली. काही ठिकाणी नव्या मशीन्सही उपलब्ध करून देण्यात आल्या. सूत्रानुसार, शासकीय रुग्णालयांमध्ये आधार संलग्न बायोमेट्रिक करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या. परंतु त्यानंतरही राज्यभरातील मेडिकलमधील २७ हजार डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांमधून केवळ ४,३८४ जणांनी बायोमेट्रिकशी आधार संलग्न केले. यात नागपूरच्या मेयो, मेडिकलमध्ये प्रत्येकी एक, आंबेजोगाई, चंद्रपूर व नांदेड मेडिकल येथून प्रत्येकी एक, पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेज येथून १८८३, औरंगाबाद मेडिकल येथून ३२२, गोंदिया, सोलापूर व कोल्हापूर मेडिकल येथून प्रत्येकी २, अकोला मेडिकल येथून ७०३, लातूर मेडिकल येथून ७७५, सर जे.जे. हॉस्पिटलमधून १७ तर सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधून ४९५ आदींचा समावेश आहे. यातही केवळ १४३ बायोमेट्रिकचा वापर करीत असल्याची माहिती ‘नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर’ने (एनआयसी) वैद्यकीय शिक्षण विभागाला उपलब्ध करून दिल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयासह इतर २० विषयांवर मे महिन्यात बैठक घेणार आहेत. यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने तातडीने सर्वांना आधार संलग्न बायोमेट्रिक करण्याचा सूचना दिल्या आहेत.
आधार संलग्न बायोमेट्रिकला राज्यभरातून ‘ठेंगा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 9:44 PM
राज्यभरातील २७ हजार डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांमधून केवळ ४,३८४ जणांनी बायोमेट्रिकशी आधार संलग्न केले आहे. धक्कादायक म्हणजे त्यातही केवळ १४३ जणच बायोमेट्रिकचा वापर करीत असल्याने आधार संलग्न बायोमेट्रिकला राज्यभरातून ‘ठेंगा’ दाखविला जात असल्याचे चित्र आहे. यात नागपूर मेयो, मेडिकलमधील केवळ एकेक जणाचा समावेश आहे.
ठळक मुद्दे२७ हजार डॉक्टर, कर्मचाऱ्यांमधून केवळ १४३ जणांकडूनच वापर : मेयो, मेडिकलमधून केवळ एक व्यक्ती