नागपूर : बँकेतीलच माजी वित्त व्यवस्थापकाने मनपाच्या नावाने बनावट डिमांड ड्राफ्ट पत्राचा आधार घेत बँकेत ९० लाखांचा घोटाळा केला. यासंदर्भात प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्रशांतसिंग हुकूमसिंग (४२, मंजूषा रिगोलिया अपार्टमेंट, तुलसी विहार, जयताळा) असे आरोपीचे नाव आहे. तो २०१८ ते २०२१ दरम्यान एचडीएफसी बँकेच्या आयटी पार्क येथील शाखेत वित्त व्यवस्थापक पदावर कार्यरत होता. १४ डिसेंबर २०१८ ते १९ मार्च २०२१ या कालावधीत त्याने स्वत:च्या पदाचा दुरुपयोग करून मनपाच्या नावाने बनावट डिमांड ड्राफ पत्र कंपनीच्या मुख्य कार्यालयात सादर केले व त्याआधारे १९ डिमांड ड्राफ्ट प्राप्त करून घेतले. याची एकूण किंमत ८९ लाख ९५ हजार ७९४ इतकी होती. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकेतर्फे सखोल चौकशी करण्यात आली. यानंतर वरिष्ठ वित्त व्यवस्थापक जयंत चौधरी यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रशांतसिंगविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.