नागपूर : नवीन प्रस्तावित विमानतळाजवळील मेट्रो रेल्वेच्या एकीकरणाला भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) हिरवी झेंडी दिली आहे. त्यामुळे या परिसरातील मेट्रो रेल्वेच्या बांधकामाला वेग येणार आहे. कॉनकोर सायडिंग आणि खापरी रेल्वे स्टेशनजवळ मेट्रो रेल्वे कॉरिडोर तयार करण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक होते. मेट्रो रेल्वेचे एकीकरण मिहान परिसरात होणार आहे. केवळ कॉनकोर सायडिंग आणि खापरी रेल्वे स्टेशनजवळ ८०० मीटर क्षेत्रफळ जागेत एलिव्हेटेड बांधकाम करण्यात येणार आहे. हे क्षेत्र नवीन प्रस्तावित विमानतळाच्या सुरक्षा झोनमध्ये येते. या कारणांमुळे मेट्रोच्या एकीकरणाच्या कामासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची परवानगी आवश्यक होती. यासंदर्भातील प्रस्ताव नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (एनएमआरसीएल) भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे दिला होता. प्राधिकरणाने ‘एनएमआरसीएल’ अधिकाऱ्यांसोबत जागेची पाहणी केली. शिवाय प्रस्तावाचा बारकाईने अभ्यास करून प्रस्तावित एकीकरणाला नाहरकत प्रमाणपत्र दिले. यामुळे मिहानमधील अॅट-गेड कामाला गती मिळून बांधकामाला वेग येणार आहे. येथील सुरक्षा भिंतीचे कामही पूर्वीपासून जोरात सुरू आहे.
मेट्रो रेल्वेला ‘एएआय’ची हिरवी झेंडी
By admin | Published: October 02, 2015 7:21 AM