नागपूर : आकाशवाणी म्हणजे जनमनाची वाणी आहे. नागपूर आकाशवाणीने प्रकाशात आणलेल्या प्रतिभावान कलावंत, साहित्यिक, कवींच्या अमिट स्मृतीच्या ‘अनुरणन’ स्मरणिकेचे प्रकाशन आकाशवाणीच्या कविसंमेलनात करण्यात आले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे सहायक केंद्र निर्देशक आर. के. गोविंदराजन तसेच सहायक निदेशक आर. आर. ढवळे उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, आकाशवाणीने कार्यक्रमांचा दर्जा अधिक वाढवावा. गतिशीलतेने देशाच्या कानाकोपऱ्यात माहिती पोहचविणारे हे सर्वाधिक सशक्त माध्यम आहे, असे ते म्हणाले. गोविंदराजन यांनी आकाशवाणीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आकाशवाणी वार्षिक पुरस्कार स्पर्धेत २०१४ साली संपूर्ण देशातून द्वितीय स्थानी आलेल्या ‘पानी डूब रहा है’ या हिंदी आणि ‘हलन्त’ या मराठी रुपकाचे सादरकर्ते हरीश पाराशर, संगीता अरजपुरे, रवींद्र भुसारी यांचा बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हे रुपक नागपूर केंद्रातर्फे सादर करण्यात आले होेते. कार्यक्रमाचे निवेदन अशोक जांभुळकर यांनी केले. अनुरणन स्मरणिकेचे संपादन आर. के. गोविंदराजन, रवींद्र भुसारी, राधिका पात्रीकर यांनी केले. याप्रसंगी आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रसारभारतीचे अध्यक्ष ए. सूर्यप्रकाश, जवाहर सरकार, केंद्रीय सूचना व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड, विख्यात उद्घोषक अमिन सायानी, भजन सम्राट अनुप जलोटा, मंगला खाडिलकर, संगीतकार राम लक्ष्मण, स्व. रवीन्द्र जैन यांच्या शुभेच्छांनी हा कार्यक्रम लक्षणीय ठरला. (प्रतिनिधी)
आकाशवाणीच्या ‘अनुरणन’ स्मरणिकेचे प्रकाशन
By admin | Published: January 10, 2016 3:34 AM