ठळक मुद्देवॉटरकप स्पर्धेत नरखेडातील ६६ गाव सहभागी : गावागावात स्पर्धेचे वातावरण
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दुष्काळाने होरपळलेल्या गावामध्ये जलक्रांती व्हावी, या उद्देशाने राज्यातील ग्रामीण भागात पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटरकप स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या नियमात पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्याचा समावेश झाला असून, नरखेड तालुक्यातील ६६ गावाने या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. ‘जलसंधारणातून मनसंधारण’ हे ब्रीद या स्पर्धेचे असून, सिने अभिनेता आमिर खान खुद्द या स्पर्धेत सहभागी गावांना भेटी देऊन गावकऱ्यांना प्रोत्साहित करतो. स्पर्धेतील गावकऱ्यांचा जोश बघता नरखेडातही आमिर खान येऊ शकतो.डिसेंबरपासून वॉटरकप स्पर्धेसाठी नरखेड तालुक्यात पाणी फाऊंडेशन व जिल्हा प्रशासनाने वातावरण निर्मिती केली आहे. जिल्ह्यात नरखेड तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष वाढल्याने, हा तालुका दुष्काळाच्या सावटात आला आहे. पाणी फाऊंडेशनच्या या उपक्रमातून जलक्रांती व्हावी, या उद्देशाने प्रशासनाने गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यास सुरूवात केली. तालुक्यातील १५५ गावापैकी सुरुवातीला १०१ गावकऱ्यांनी सहमती दर्शविली. परंतु या स्पर्धेतील काही टप्पे काही गावांना पुर्ण करणे शक्य झाले नाही. अखेर या स्पर्धेसाठी ६६ गावांचे गावकरी पुढे आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या गावांनी स्पर्धेपुर्वीची सांडपाण्याचे शोष खड्डे, नर्सरी, आगपेटीमुक्त शिवार, माती परीक्षण ही कामे पुर्ण केली आहे. ८ एप्रिल ते २२ मार्च हा स्पर्धेचा कालावधी असून, गावकरी जलसंवर्धनाचे उत्कृष्ट काम करण्यासाठी सज्ज झाले आहे. गावागावात बैठका, चर्चा, नियोजनाचे फड रंगत आहे. लहान थोराबरोबरच महिलाही या स्पर्धेत खांद्याला खांद्या लावून उतरल्या आहे. गावकऱ्यांना या स्पर्धेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे, कृषी अधिकारी वर्ग २ पल्लवी तलमले सातत्याने गावकऱ्यांशी संपर्कात आहे. विशेष म्हणजे डॉ. बलकवडे यांना या प्रकल्पाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून गावागावात एकोपा निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून राज्याचे पहिले पारितोषिक पटकाविण्याचा मानस बनविला आहे.