नागपूर : उपराजधानीत ‘नायलॉन’ मांजावर बंदी लागू करण्यात यावी, या मागणीसाठी आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीने बुधवारी महापौर दयाशंकर तिवारी यांचा घेराव केला. मकरसंक्रांतीच्या तोंडावर शहरात एका तरुणाचा मांजामुळे मृत्यू झाला. ‘नायलॉन’ मांजावर बंदी असूनदेखील नागपुरातील बाजारपेठांमध्ये खुलेआम विक्री कशी काय सुरू आहे, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
प्रणय ठाकरे या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी आरोप निश्चित करून दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच शहरात ‘नायलॉन’ मांजावर असलेल्या बंदीचे पालन व्हायला हवे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जुनी शुक्रवारी येथील पतंग बाजारात कार्यकर्त्यांनी जनजागृतीदेखील केली. यावेळी आघाडीचे अध्यक्ष गिरीश तितरमारे, पीयूष आकरे, प्रभात अग्रवाल, ओम आरेकर, आकाश कावळे, विजय धकाते, रोशन डोंगरे, पिंकी बारापात्रे, रजत भोयर, नीरज शर्मा, पवन बागडे, कृतल वेलेकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.