नागपूर : आरटीई अंतर्गत शिक्षण देणाऱ्या शाळांचे १८०० कोटी रुपये सरकारकडे थकीत आहेत. त्याचा परिणाम म्हणून गरीब वंचित घरातील मुलांना शैक्षणिक फटका बसत आहे. निधी न दिल्यामुळे अनेक ठिकाणी शाळा अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे सबंधित शाळांना आरटीई शुल्काची प्रतिपूर्ती करावी, या मागणीसाठी आम आदमी पार्टीने मंगळवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक दिली.
विदर्भ अध्यक्ष देवेंद्र वानखडे यांच्या नेतृत्त्वात निदर्शने करीत थकीत शैक्षणिक शुल्काची रक्कम आठ दिवसात अदा करावी व लाखो मुलांचे शिक्षण चालू ठेवावे अशी मागणी करण्यात आली. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. राजकीय नेत्यांची मुले पंचतारांकित शाळेत, परदेशात शिक्षण घेतात. तर सरकार गरीब, वंचित घरातील मुलांचे शिक्षण व्हावे यासाठी मात्र निधी नाही असे सांगत हात वर करीत आहे' अशी टीका यावेळी वानखेडे यांनी केली.
आंदोलनात कविता सिंगल, जगजीत सिंग, अशोक मिश्रा, शंकर इंगोले, गणेश रेवतकर, भूषण ढाकूलकर, रोशन डोंगरे, अजय धर्मे, सुषमा कांबळे, अमेय नारनवरे, प्रदीप पौनीकर, गौतम कावरे, सोनू फटींग, सचिन लोणकर, रविंद्र गिदोळे, संदीप कोहे, विनीत गजभिये आदींनी भाग घेतला.