नागपूर : दिल्लीच्या धर्तीवर नागपुरातही १५६ वर्ल्ड क्लास शाळा उभारल्या जातील, अशी हमी आम आदमी पक्षाच्या दिल्लीच्या आमदार अतिशी यांनी नागपुरात गुरुवारी दिली.
महापालिकेच्या निवडणुकीत आप स्वबळावर सर्व जागा लढविणार आहे. आपने नागपूरकरांना १५ हजार लिटर शुद्ध पाणी मोफत देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर दर्जेदार शिक्षणाची हमी देण्यात आली आहे. आ. अतिशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दिल्लीत केजरीवाल सरकारने आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे. शिक्षणाचे बजेट २२ टक्के करून सरकारी शाळा खाजगी शाळेपेक्षा चांगल्या दर्जेदार बनविल्या. त्यामुळे मागच्या वर्षी चार लाख विद्यार्थ्यांनी खाजगी शाळेतून नावे काढून सरकारी शाळेत प्रवेश घेतला आहे. दिल्लीच्या शाळांचे निकाल चांगले यायला लागलेत. सरकारी शाळेमधील विद्यार्थ्यांना आयआटी व एम्समध्ये प्रवेश मिळाले आहेत. आता हेच दिल्ली मॉडेल नागपूर महापालिकेच्या माध्यमातून नागपुरात आणण्याची तयारी करीत असल्याचे आ. अतिशी यांनी सांगितले.
मनपाच्या १५० शाळा बंद
नागपूर महापालिकेच्या सुमारे १५० शाळा आजवर बंद झाल्या आहेत. गेल्या १५ वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता आहे, नागपुरात भाजपचे हेवीवेट नेते आहेत. असे असतानाही येथील शाळांचा दर्जा सुधारला नाही. शिक्षणावर दरवर्षी ३ टक्के बजेट ठेवले जाते, पण प्रत्यक्षात तेवढाही खर्च केला जात नाही. शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. सुविधा नाहीत. शिक्षकांना ट्रेनिंग नाही. अनेक शाळेत नगरसेवक किंवा मनपाची कार्यालये सुरू केली आहेत. काही शाळा तर भाड्याने देऊन तेथे भाजपचे पदाधिकारी आपली खाजगी शाळा चालवितात असल्याचा आरोपही आ. अतिशी यांनी केला. हे चित्र बदलेले जाईल, असा दावा त्यांनी केला.