नागपूर : विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागची कारणमीमांसा जाणण्यासाठी आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र कार्यकारिणीने १७ मे पासून शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. विदर्भ आणि मराठवाडा येथून ही यात्रा निघणार आहे. विदर्भातील यात्रेला अमरावती येथून सुरुवात होणार आहे. भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून, यात्रेला सुरुवात होणार आहे. यात्रा अमरावती मार्गे वर्धा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा जाणार आहे. मराठवाड्यात बीड येथून यात्रेला सुरुवात होणार आहे. समारोप २४ मे रोजी सिंधखेड राजा येथे होणार आहे. या यात्रेमध्ये आपचे २०० कार्यकर्ते गावागावात जाऊन, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांस भेटणार आहे. आत्महत्येमागच्या कारणांचा शोध घेणार आहे. गावागावात शेतकऱ्यांच्या सभा घेणार आहे. यात्रेमागचा घोषवारा राज्य सरकारपुढे सादर करणार आहे. शासनाने याची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा आपचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे यांनी पत्रपरिषदेत दिला. तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांचा प्राथमिक शिक्षणाचा खर्च ‘आप’ करणार आहे. पत्रपरिषदेला अलिम पटेल, जगजितसिंग, मंगेश तेलंग, कविता सिंगल, अशोक मिश्रा उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘आप’ची शेतकरी संवाद यात्रा १७ पासून
By admin | Published: May 16, 2015 2:26 AM