कैलास निघोट
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सहा दिवसापूर्वी नवजात बाळ (मुलगी) देवलापार नजीकच्या निमटाेला शिवारातील एका निर्मनुष्य झाेपडीत आढळून आले. त्या बाळावर नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, ती सुस्थितीत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्या बाळाला दत्तक घेण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत. दुसरीकडे, देवलापार (ता. रामटेक) पाेलीस तिच्या आईवडिलांच्या शाेधात असून, त्यांचा अद्यापही थांगपत्ता लागला नाही.
अज्ञात आईवडिलांनी तिला मंगळवारी (दि. १९) रात्री निमटोला शिवारातील हंसराज कुमरे यांचे शेतातील झोपडीच्या मचानावर सोडून दिले हाेते. हंसराज यांची पत्नी सुनीता शेतात जागली करण्यासाठी गेली असता, तिला रात्री ११ वाजताच्या सुमारास मचानावर बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. सुरुवातीला आपण घाबरले असल्याचेही तिने सांगितले. नवजात बाळ दिसताच तिने ग्रामस्थांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच बाळाला ताब्यात घेत नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले.
गाेंडस असलेल्या या नवजात बाळाला साेडून जाण्याची हिंमत त्या आईला कशी झाली, हे अनाकलनीय आहे. त्या बाळाला दत्तक घेण्याची इच्छाही अनेकांनी व्यक्त केली. त्यात काही पाेलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला दत्तक घेण्याच्या प्रतिक्रिया काही पाेलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. अनेकांनी तिला दत्तक घेण्यासाठी देवलापार पाेलिसांशी संपर्कही साधला आहे.
प्रेमसंबंधाची चर्चा
त्या बाळाचा जन्म तिच्या आईवडिलांच्या प्रेम व अनैतिक संबंधातून झाला असावा, अशी सर्वत्र चर्चा आहे. त्या आईवडिलांना मुलीच असाव्यात. मुलगा व्हावा म्हणून त्यांनी या मुलीला जन्म दिला असावा, अशी शक्यताही काहींनी व्यक्त केली. परंतु, तिचा जन्म नेमका कुठे झाला, तिला या ठिकाणी कसे आणले, याचा उलगडा मात्र झाला नाही. बाळाची नाळ बघता तिचा जन्म दवाखान्यात झाला असावा, अशी शक्यता काहींनी व्यक्त केली.
बाळ काेजागरी पाैर्णिमेच्या रात्री शेतातील मचानावर आढळून आले. तिच्या आईवडिलांचा शाेध घेणे सुरू आहे. त्यासाठी या भागातील सर्व सरकारी व खासगी दवाखाने, प्रसूती करणाऱ्या दाई व संबंधितांची चाैकशी केली जात आहे. यासाठी टीम तयार करण्यात आली असून, तिच्या आईवडिलांना शाेधून काढण्यात निश्चितच यश येईल.
- प्रवीण बाेरकुटे, ठाणेदार, देवलापार पाेलीस ठाणे.