नागपूर : बेशिस्त प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी चालविलेल्या पाच महिन्याच्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत अधिकाऱ्यांच्या हाती तब्बल तीन लाख प्रवासी लागले. दंडापोटी या प्रवाशांकडून रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी १८ कोटी रुपये वसूल केले.
ज्या श्रेणीचे तिकीट घेतले, त्याच श्रेणीतून प्रवास करा. विनातिकीट प्रवास करू नका, अन्यथा तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागेल, असे रेल्वेकडून वारंवार सांगितले जाते. मात्र मोफत प्रवास करण्याची सवय असलेले, बेशिस्त प्रवास करणारे रेल्वेच्या इशाऱ्याला काही दाद देत नाही. अशा प्रवाशांना हुडकून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे तसेच वाणिज्य विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल २०२३ पासून सातत्याने विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली.
सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्थात पाच महिन्यात तब्बल २ लाख, ९८ हजार प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यातील बहुतांशजण तिकीट न काढताच प्रवास करीत होते. काही जणांनी तिकीट जनरलचे आणि प्रवास एसीच्या कोचमधून केल्याचे तर काही जणांनी लगेज (सामान) बुक न करता अनधिकृतपणे रेल्वेतून वाहतूक केल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून तपासणी पथकाने तब्बल १८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.
ही तिकीट तपासणी मोहीम आणि दंड वसुली मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, आमला आणि बल्लारशाह रेल्वेस्थानक आणि आजूबाजूला राबविण्यात आली. या मोहिमेत सर्वाधिक प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून दंडाची सर्वाधिक रक्कम वसूल करणाऱ्या आमला डेपो पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आशुतोष श्रीवास्तव यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.