नागपूर : हेल्मेटची सक्ती असतानाही वापराविषयी उदासीनता दिसून येत आहे. केवळ जानेवारी महिन्यात विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या ५९ हजार ८१८ चालकांवर शहर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यातून १५ लाख ६० हजार ५०० रुपयांचा दंड आकारला आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांविरोधात ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न केल्याने अपघातात जीव गमवावा लागतो. भरधाव वाहने चालविणारी तरुणाई हेल्मेटच्या वापराविना अपघाताची शिकार ठरत आहे. अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी वेळाेवेळी वाहतूक विभागाकडून हेल्मेटबाबत विशेष मोहीम राबवली जाते, परंतु त्यानंतरही नियम तोडणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याचे शहरातील चित्र आहे. नववर्षात तरी अपघातांची संख्या कमी करण्यासाठी पोलीस उपायुक्त (वाहतूक) सारंग आवाड यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात ५९ हजार ८१८ विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई केली.
-४,४४० वाहन चालकांनी तोडले सिग्नल
चौकात पोलीस नाही तर, तोड सिग्नल असा प्रकार सर्रास सुरू आहे. जानेवारी महिन्यात शहर वाहतूक पोलिसांनी अशा ४ हजार ४४० वाहनचालकांवर कारवाई केली. यांच्याकडून ४ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा दंड आकारला.
-वेगाने वाहन चालविणाऱ्या १,७१५ चालकांवर कारवाई
वेगाने वाहन चालविणाऱ्या चालकाचा अपघात झाल्यास अपघाती मृत्यूचे प्रमाण कित्येक पटीने वाढते, शिवाय इतरांचाही जीव धोक्यात येतो. जानेवारी महिन्यात अशा १ हजार ७१५ चालकांवर कारवाई करीत ४९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय, ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या १ हजार १२ चालकांकडून ६६ हजार रुपयांचा दंड आकारला. मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या ९१ चालकांवर तर नो पार्किंगच्या ठिकाणी वाहन उभे करणाऱ्या ९४२ चालकांवरही वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. फेब्रुवारी महिन्यात या मोहिमेला आणखी गती देण्यात येईल, असे शहर वाहतूक पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.