नागपूर : महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा गाजत आहे. साहित्याचा पुरवठा न करताच खोटी बिले सादर करून कोट्यवधी रुपये उचलण्यात आले.
हा घोटाळा गाजत असतानाच मागील काही वर्षांतील साहित्य खरेदीतील घोटाळ्याचे नवनवीन खुलासे पुढे येत आहेत. आता १२४९ रुपयांचा टोनर ४१५० रुपयांना, तर २९९ रुपयांचा कार्बन पेपर १९०० रुपयांना खरेदी करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे.
महापालिकेतील दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य लागते. वर्ष २०१६-१७ पासून जादा दराने साहित्याचा पुरवठा करण्यात आल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले आहे. बाजारात कार्बन पेपर डबल साईज प्रति पॉकीट २९९ रुपयांना असताना १९०० रुपयांना, तर झेरॉक्स मशीनच्या टोनरची किंमत १२४९ रुपये असताना तो १८०० ते ४,१६० रुपयांना खरेदी केला. हा घोटाळा कोट्यवधींचा आहे. यासंदर्भात शुक्रवारी सभागृहात प्रशासनाला जाब विचारणार असल्याची माहिती नगरसेवक संदीप सहारे यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.
कॅनन झेरॉक्स मशीन मॉडेल क्र. २३८१/२०२२ साठी लागणारा टोनर बाजारात ३०५ रुपयांना मिळतो. मात्र हाच टोनर २८५० रुपयांना खरेदी करण्यात आला. कॅनन झेरॉक्स मशीन मॉ. क्र. २३८१ / २०२२ साठी लागणारा ड्रम बाजारात १ हजार रुपयांना मिळतो, तो १७९०० रुपयांना खरेदी करण्यात आला. रिको झेरॉक्स मशीनच्या ड्रमची किंमत ११९९ रुपये असताना, तो २४ हजार दराने खरेदी करण्यात आला, तर याच मशीनचा टोनर बाजारात ४९९ रुपयांना मिळत असताना, तो ३,३०० रुपये दराने खरेदी करण्यात आला. ४९ रुपयांचा टर्किश नॅपकीन १५५ रुपयांना खरेदी करण्यात आला.
पन्चिंग मशीन, ऑफिस बॅग, लॅम्प, काॅर्डलेस फोन मेक यासह अन्य साहित्य खरेदीतही असाच घोटाळा आहे. पुरवठादार व अधिकाऱ्यांंच्या संगनमताने हा घोटाळा केल्याचा आरोप संदीप सहारे यांनी केला.
सभागृहात गाजणार घोटाळा
मनपाच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी स्टेशनरी घोटाळा गाजणार आहे. घोटाळ्यावरून विरोधकांसोबतच सत्ताधारी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत आहेत. सभागृहात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती संदीप सहारे यांनी दिली. यावर प्रशासन आपली भूमिका कशी मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.