राजू गेडाम
चंद्रपूर : नागाने उंदीर, उंदराची पिल्ले गिळल्याचे ऐकिवात असेल; पण सशाची पिल्ले गिळल्याचे कधी ऐकले आहे का? आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे... नागाने चक्क एक - दाेन नव्हे, तर तब्बल १६ पिल्ले गिळली. ही आश्चर्यकारक घटना मूल (जि. चंद्रपूर) तालुक्यातील करवन गावात घडली.
सर्पमित्रांनी नागाला पकडल्यानंतर गिळलेली सर्वच पिल्ले ताेंडावाटे बाहेर काढली. परंतु ताेपर्यंत त्या चिमुकल्या पिल्लांचा मृत्यू झाला हाेता. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा सर्व प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, या पिल्लांच्या आईचाही मृत्यू झाला.
करवन येथील दिवाकर चाैधरी यांनी पालन करण्यासाठी ससे आणले हाेते. त्यातील एका मादीने काही दिवसांपूर्वी १६ पिल्लांना जन्म दिला होता. मूल तालुक्यातील करवन हे वनविभागातील बफर झोनधील छोटेसे जंगली गाव. या गावात वन्यप्राणी, साप व अन्य श्वापदांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.
शुक्रवारी रात्री ८.३० वाजता अचानक काही तरी आवाज झाल्याचे जाणवले. त्यावेळी चौधरी यांनी बाहेर जाऊन बघितले, तर काय, चक्क पाच फुटांचा नाग समोर असून, ससा मरून पडल्याचे दिसले. सशाची १६ पिल्ले मात्र दिसली नाहीत. यावरून याच नागाने सशाची पिल्ले गिळली असावीत, असा अंदाज बांधत आपल्या परिवारासाठी घातक ठरू नये यासाठी सर्पमित्राला बोलाविण्यात आले. त्यावेळी सर्पमित्र तन्मय झिरे, सोबत दिनेश खेवले व अक्षय दुम्मावार यांनी रात्रीची वेळ असल्याने मोठ्या शिताफीने नागाला पकडले. नागाला पकडताच गिळलेली सशाची १६ पिल्ले मृतावस्थेत बाहेर आली. त्या नागाला नंतर जंगलात साेडण्यात आले.