अभय लांजेवार
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : ‘सोयाबीनला शेंगा किती?’ असा प्रश्न सध्या शेतकरी एकमेकांना हमखास विचारतात. कुणी २०-२५ सांगतात तर कुणी ४०-५० म्हणत समाधान मानतात. अशातच एखाद्या शेतकऱ्याने एका झाडाला दोनशेपेक्षाही अधिक शेंगा असल्याचे छातीठोकपणे सांगितले तर आश्चर्याचा धक्का बसणारच ना! हेच आश्चर्य उमरेड तालुक्यात बघावयास मिळत आहे. अन्य शेतकरीसुद्धा प्रत्यक्ष फेरफटका मारत सोयाबीनच्या या ‘प्लॉट’कडे अभ्यासक दृष्टीने बघत आहेत.
सतीश चकोले या तरुणाच्या शेतात ही कमाल झाली असून एका झाडाला तब्बल २०० ते ३०० शेंगा खचाखच नजरेस पडतात. उमरेड येथून ३ किमी. अंतरावरील खेडी शिवारात सोयाबीनचे हे हिरवेकंच शेत शेंगानी चांगलेच बहरलेले दिसते. सतीशच्या शेतातील हे उत्पादन कित्येक वर्षानंतरचे सर्वोत्तम आणि विक्रमी ठरणार, असा अंदाज बांधल्या जात आहे.
सतीशने एकूण चार एकरात फुले संगम (केडीएस ७२६) हे आणि फुले कल्याणी या वाणाचे साेयाबीन पीक घेतले. सोयाबीनची रुंद सरी वरंबावर टोकन पद्धतीने लागवड केली. पहिली लागवड फसली. अनेक जण हसले. हिंमत ठेवली. दुसऱ्यांदा तेच बियाणे आणले व लागवड केली. खत, तण, कीड व रोग व्यवस्थापन यांचा समतोल साधला. निसर्गानेही साथ दिली. सध्या शेंगांची वाढ जोमदार असून येत्या काही आठवड्यात हे वाण कापणीला येणार आहे. निसर्गाने साथ दिली तर १५ ते १८ क्विंटल एकरी उत्पादन मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. कृषी सहायक अरुण हारोडे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचे सतीश आवर्जून सांगतो.
....
अशी केली लागवड
उमरेड तालुक्यात टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड करण्याचे प्रमाण या हंगामात बऱ्यापैकी आहे. ही लागवड करताना दोन्ही वरंबामधील अंतर साडेतीन फूट आणि झाडांमधील अंतर नऊ इंच ठेवल्या गेले. वरंबावर दोन ओळी आणि या ओळींमधील अंतर १२ इंच होते.
....
तब्बल २० एकरात टोकन
उमरेड तालुक्यातील चिचोली (रिठी) शिवारात चंद्रशेखर पाटील या शेतकऱ्याने चक्क २० एकरात टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड केली. रात्रंदिवस परिश्रम घेतले. जेएस-९३०५ व जेएस-९५६० या दोन वाणांची निवड केली. पारंपरिक पद्धतीच्या सोयाबीन पेरणीला फाटा देत मोठ्या प्रमाणावर लागवड केल्याने अनेकांनी नेहमीप्रमाणे टीका केली. आता त्याचेही पीक बहरले असून सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. नवेगाव साधू येथील शेतकरी संजय वाघमारे यांनीसुद्धा सहा एकरात टोकन पद्धतीचा प्रयोग यशस्वी केला. जेएस-२०३४ व जेएस-९५६० या दोन वाणांची लागवड केली. या दोन्ही प्रयोगशील शेतकऱ्यांना एकरी १२ ते १५ क्विंटल उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे. नेमके उत्पादन कापणी व काढणीनंतरच कळेल, एवढे नक्की!
....
या पद्धतीत बियाणे कमी लागते. सूर्यप्रकाश, हवा, पाणी याचा समतोल राखला जातो. रोग व किडींचे प्रमाण कमी राहून झाडांची निरोगी वाढ होते. फूल-फळधारणा उत्तम होत उत्पादनसुद्धा वाढते. पुढील हंगामात टोकन पद्धतीने लागवडीचे क्षेत्र नक्कीच वाढेल.
- अरुण हारोडे, कृषी सहायक, उमरेड