लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुगार अड्ड्यावर पैशावरून झालेल्या वादातून आरोपींनी गुंड मारोती नव्वा याचे अपहरण करून चांगलीच मारहाण केली. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. मारोती ऊर्फ नव्वा संतोष वलके हा मीरे ले-आऊट येथे राहतो. नव्वा पूर्वी गुन्हेगारी जगतात चांगलाच चर्चेत होता. नव्वा सोमवारी रात्री दोन मित्रांसोबत हिंगणा येथे गेला होता. तिथे साजिद नावाच्या मित्राने पार्टी ठेवली होती. या पार्टीत बरेच गुन्हेगार होते. त्यांनी रात्री जुगार खेळला. जुगारात विजू मोहोड पैसा हरला. विजूने त्याच्या साथीदार सुजित, रामदास राऊत व अन्य दोघांच्या मदतीने नव्वाला दोन लाख रुपये कुणालाही मागून देण्याचा आग्रह केला. परंतु नव्वाने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे विजू व त्याचे साथीदार संतप्त झाले. ते नव्वाला शिवीगाळ करून, धमकावून निघून गेले.नव्वा मंगळवारी पहाटे ५ वाजता त्याचा साथीदार अशोक यादव याच्यासोबत घरी आला. दोघेही घरासामोर बोलत होते. त्याचवेळी विजू आपल्या साथीदारासोबत तिथे पोहचला. त्यांनी नव्वाला जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसविले. त्याला लाथाबुक्कीने जोरदार मारपीट केली. त्याला म्हाळगीनगर चौकात उतरवून फरार झाले. नव्वा याने नंदनवन पोलीस ठाण्यात पोहचून तक्रार दाखल केली. नव्वा व आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने पोलीस तात्काळ सतर्क झाले. पोलिसांनी अपहरण, मारपीट व धमकविल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला.सूत्रांच्यानुसार एक महिन्यापूर्वी सुद्धा नव्वावर हल्ला झाला होता. अमरावती रोडवरील पत्रकार सहनिवासाच्या चौकात मानकापूरच्या तडीपार गँगस्टर व त्याच्या सहकाऱ्यांनी नव्वाला घेरले होते. नव्वाला संशय येताच तो जवळच्या फुटबॉल मैदानात पळाला होता. तिथे खेळाडू व लोकांची गर्दी असल्याने आरोपी रिकाम्या हाती परतले. नव्वा तक्रार करण्यासाठी सीताबर्डी ठाण्यातही पोहचला होता. परंतु गुन्हा नोंदविण्यास उशीर झाल्यामुळे गँगस्टरने नव्वाशी भेटून वाद सोडविला होता. जुगारात हरल्यामुळे हल्लाहिंगणामध्ये जुगारात हरल्यामुळे एका युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला. मांगली येथील सतीश रंदई (२४) व सुभाष ऊर्फ सुशील कंगाले (२५) सोमवारी रात्री जुगार खेळत होते. जुगारात हरल्याने सुभाषने सतीशसोबत वाद घातला. त्याने सतीशवर चाकूने हल्ला करून, जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हिंगणा पोलिसांनी हत्येच्या प्रकरणात गुन्हा नोंदवून सुभाषला अटक केली आहे. हिंगणा परिसरात एकाच दिवशी जुगार अड्ड्यावर झालेल्या वादातून घातपाताच्या घटना घडल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.