भल्या सकाळी बेपत्ता : सर्वत्र खळबळ नागपूर : श्री श्रद्धानंद अनाथालयातील चार वर्षीय यश नामक बालक बेपत्ता झाला. तो मूकबधिर आहे. कडाक्याच्या थंडी अन् दार बंद असताना चिमुकला स्वत:हून बाहेर निघून जाणे शक्य नाही. त्यामुळे त्याचे अपहरणच करण्यात आल्याचा निष्कर्ष काढून प्रतापनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, मूकबधिर चिमुकल्याचे अपहरण झाल्याचे वृत्त पसरल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. प्रतापनगर पोलिसांसोबतच शहर पोलीस दलातील वेगवेगळी पथके या चिमुकल्याचा कसून शोध घेत आहेत.गेल्या महिन्यात चिमुकला यश जरीपटका परिसरात बेवारस फिरताना आढळला होता. एकाने त्याला पोलिसांच्या हवाली केले. पालक म्हणून यशवर हक्क सांगण्यासाठी कुणीच आले नाही. त्यामुळे २५ नोव्हेंबरला पोलिसांनी त्याला श्री श्रध्दानंदपेठ अनाथालयात दाखल केले. नेहमी प्रमाणे आज सकाळी ६ ते ६.३० या वेळेत प्रार्थना सुरू असताना चिमुकला यश अनाथालयातून बेपत्ता झाला. प्रार्थना संपल्यानंतर नाश्ता वगैरे देण्याच्या वेळी यश दिसत नसल्यामुळे त्याची शोधाशोध सुरू झाली. सर्वत्र शोधाशोध करूनही तो कुठेच आढळला नाही. त्यामुळे अनाथालयाच्या अधीक्षिका प्रतिमा श्याम दिवाणजी (वय ४२) यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. मूकबधिर असल्यामुळे कडाक्याच्या थंडीत यश स्वत:हून निघून जाण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे त्याचे अपहरणच करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. प्रतापनगर पोलिसांनी दिवाणजी यांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्याची माहिती शहर पोलीस दलाला कळताच खळबळ निर्माण झाली. वरिष्ठांनीही याबाबतची माहिती प्रतापनगर पोलिसांकडून जाणून घेतली. तसेच वेगवेगळी पथके यशच्या शोधासाठी कामी लावली.
अनाथालयातून चिमुकल्याचे अपहरण
By admin | Published: December 25, 2014 12:30 AM