लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील प्रसिद्ध प्लायवूड व्यावसायिक व पदमभूषण मौलाना अब्दुल करीम पारेख यांचे सुपुत्र अब्दुल गफूर पारेख यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ७१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.पारेख व्यवसाय समूहाची धुरा सांभाळताना त्यांनी वडिलांकडून मिळालेला सामाजिक कार्याचा वारसाही जबाबदारीने सांभाळला. जात, धर्म, पंथ, भाषा, रंग असा भेदभाव न करता केवळ मानवी मूल्यांना महत्त्व देत भुकेल्याला अन्न, गरजूंना मदत आणि गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करण्यात त्यांनी कायम पुढाकार घेतला होता. इंग्रजी, उर्दू, हिंदी, मराठी व गुजराती भाषेवर प्रभुत्व असलेल्या अब्दुल गफू र यांनी अरबी भाषा शिकविण्यात उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी २०० तासात अरबी शिकण्याचे तंत्र विकसित केले व ते भारतासह जगभरातील विद्यार्थ्यांना शिकविले. त्यांचे हे तंत्र भारत व इतर देशांच्या विद्यापीठांनीही आत्मसात केले आहे. एक वक्ता म्हणूनही त्यांनी नावलौकिक मिळविला होता. राजकारण व प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या अब्दूल पारेख यांनी आयुष्यभर मानवी मूल्यांचा प्रसार केला.
नागपुरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अब्दुल गफूर पारेख यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 10:28 AM