नागपूर : सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या दोन पॅकेजचे काम मे. अभि इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन प्रा. लि. ला देण्यात आले आहे. निविदेतील अटींची पूर्तता करीत कंपनीने १३ ते १४ टक्के कमी दराने निविदा भरली. यानंतरही सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत कंपनीच्या दोन्ही निविदा हेतुपुरस्सर नामंजूर करण्यात आल्या. यासाठी ही कंपनी मुंबई महापालिकेने ब्लॅकलिस्ट केली असल्याचे कारणही समोर करण्यात आले. मात्र, वास्तविकत: ही कंपनी राज्यातील कुठल्याही भागात ब्लॅकलिस्ट झालेली नाही. विशेष म्हणजे ही नागपूर बेस कंपनी आहे. अभि इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेडचे प्रमुख अजय आर. विजयवर्गीय यांनी लोकमतशी बोलताना या बाबीचा खुलासा केला. ते म्हणाले, कंपनीने मुंबईत कोणत्याही प्रकारचे काम केलेले नाही. मुंबई महापालिकेने आपल्या कंपनीला ब्लॅकलिस्टही केलेले नाही. ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, रेल्वे या क्षेत्रात कंपनीला काम करण्याचा दीर्घ अनुभव आहे. पेवमेंट क्वॉलिटी काँक्रिट(पीक्यूसी)च्या मुद्यावर जो चुकीचा प्रचार करण्यात आला आहे तो आधारहीन आहे. त्यात तथ्य नाही. कंपनीने पीक्यूसीच्या आधारावर १६ हजार ७२५ क्युबिक मीटर सिमेंट काँक्रिट रोडचे काम केले आहे. कंपनीने खापरखेडा, कोराडी, चंद्रपूर वीज प्रकल्पातही काम केले आहे. यासाठी कंपनीला दर्जेदार काम करण्याचे प्रमाणपत्रही मिळाले आहे. महापालिकेतर्फे कंपनीला जी कागदपत्रे व माहिती मागविण्यात आली ती सर्व देण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच महापालिकेतर्फे प्रस्ताव तयार करण्यात आला. संबंधित कंपनीला काम देण्यात काहीच आक्षेप नाही, असे कायदेशीर सल्ल्यात नमूद आहे. असे असतानाही प्रशासनाने सादर केलेला प्रस्ताव स्थायी समितीने नामंजूर करणे आश्चर्यकारक आहे. (प्रतिनिधी)
अभि इंजिनीअरिंग ब्लॅकलिस्ट कंपनी नाही
By admin | Published: June 29, 2016 2:55 AM