सत्र न्यायालय : डब्बा व्यापार प्रकरणनागपूर : नऊ हजार कोटी रुपयांच्या डब्बा व्यापारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एका व्यापाऱ्याला अटक केली. या आरोपीला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला यांच्या न्यायालयाने ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी रिमांड सुनावला. अभिषेक मुकुंद बजाज, असे आरोपीचे नाव असून तो हिवरी ले-आऊट येथील रहिवासी आहे. या प्रकरणात आतापर्यंत कुशल किशोर लद्दड रा. रामदासपेठ, नीरज ओमप्रकाश अग्रवाल रा. हिवरी ले-आऊट, निमित किरिट मेहता रा. कांदिवली(पूर्व) मुंबई यांच्यासह १४ जणांना अटक करण्यात आलेली आहे. अभिषेक याचे शास्त्रीनगर येथील हनि- रितिका अपार्टमध्ये कार्यालय आहे. या ठिकाणी अभिषेक, त्याचा भाऊ आशिष, अंकित मालू आणि विनय अग्रवाल हे बेकायदेशीररीत्या समांतर स्टॉक एक्सचेंज चालवून रोख स्वरूपात हा व्यवसाय करीत होते. या कार्यालयातून ‘सौदा सॉफ्टवेअर’ आणि अन्य संगणकीय सामुग्री जप्त करण्यात आलेली आहे. आरोपींपैकी मालू आणि अग्रवाल यांच्या अटकपूर्व जामिनावर ७ जून रोजी सुनावणी होणार आहे. अभिषेक बजाज याला अटक करण्यात आल्यानंतर त्याला सहायक पोलीस निरीक्षक पी. एस. सानप यांनी न्यायालयात हजर केले होते. सरकार पक्षाने आरोपीचा १० दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मागितला होता. बचाव पक्षाने पोलीस कोठडीस विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपीला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र मेंढे यांनी तर आरोपीच्यावतीने अॅड. आर. के. तिवारी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
अभिषेक बजाजला तीन दिवस पोलीस कोठडी
By admin | Published: June 04, 2016 2:47 AM