लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचा विकास गतीने होत आहे. गडकरी व फडणवीस हे दोन्ही नेते त्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. नागपूर स्मार्ट सिटी होणार आहे. शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योग, व्यापार या सर्वच क्षेत्रात नागपूरचा विकास होत आहे. देशाचे हृदयस्थान असलेल्या या शहरात देशाच्या विकासाचे केंद्र होण्याची क्षमता आहे, अशा शब्दात राष्ट्रपती कोविंद यांनी नागपूरचे महत्त्व अधोरेखित केले. नागपूर महापालिकेतर्फे रेशीमबाग मैदानावर उभारण्यात आलेल्या कविवर्य सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण व कवी सुरेश भट यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल उपस्थित होते.नागपूरचे सांस्कृतिक क्षेत्र समृद्ध होणार : गडकरीयावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठी भाषेला सांस्कृतिक क्षेत्राने समृद्ध केले आहे. यात कवी, साहित्यिकांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्र ही गुणवंतांची खाणच आहे. सुरेश भट सभागृह प्रत्यक्ष साकारणे ही स्वप्नपूर्तीच आहे. यामुळे नागपुरातील सांस्कृतिक चळवळीला चालना मिळणार असून हे क्षेत्र आणखी प्रगल्भ व समृद्ध होणार आहे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. देशातील आकर्षक सभागृहांमध्ये याचा समावेश होणार असून याच्या उभारणीत अनेक अडचणीदेखील आल्या. मात्र मुख्यमंत्र्यांनी यात मोठे सहकार्य केले. हे काम सर्वोत्कृष्ट व्हावे हा माझा सुरुवातीपासूनचा आग्रह होता. एरवी मी कामातील त्रुटी शोधतच असतो. मात्र या सभागृहाचे काम अतिशय चांगल्या दर्जाचे आहे, असेदेखील गडकरी म्हणाले. या सभागृहाचा विधायक उपयोग व्हायला हवा. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ यांना सभागृह कमी किमतीत उपलब्ध करून द्यावे. पाच हजार रुपयांच्या वर याचे भाडे अशा लोकांकडून घेण्यात येऊ नये, असे आवाहन गडकरींनी मनपा प्रशासनाला केले. नागपूर मनपाने देशातील सर्व महानगरपालिकांसमोर आदर्श निर्माण केला आहे, असेदेखील गडकरी म्हणाले. यावेळी गडकरी यांनी सुरेश भट यांच्या आठवणींना उजाळा दिला.‘भट हे प्रतिभाशाली कवी तर होतेच, शब्दांचे जादुगारही होते. त्यांचे काव्य मनाचा वेध घ्यायचे. ते तितकेच स्फोटकदेखील होते. अनेकांना त्यांनी प्रेरणा दिली.’महाराष्ट्र देशाला नवी शक्ती देऊ शकतोमहाराष्ट्र ही वीर, क्रांतिकारी, संत व महापुरुषांची भूमी आहे. या राज्याने देशाला रत्न प्रदान केले असून नेतृत्वाचा एक प्रवाह दिला आहे. सामाजिक बदलांसाठी महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्रानेच देशाला स्त्री शिक्षणाचा मार्ग दाखविला. संगीत, कला, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान मोठे आहे. २१ व्या शतकात महाराष्ट्र देशाला नवी शक्ती देऊ शकतो, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला.यावेळी राष्ट्रपती कोविंद म्हणाले, नागपुरात साक्षरतेचे प्रमाण ९२ टक्के झाले असून पुणे, औरंगाबाद व मुंबईलाही मागे टाकले आहे. नागपूर हा राज्यातील सर्वाधिक साक्षर असलेला जिल्हा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. नागपूरचे लोक देशाच्या विकासात आपली भूमिका पार पाडत राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कवी सुरेश भट यांनी मराठी भाषेचा सन्मान द्विगुणित केला. त्यांचा पाय लहानपणापासून पोलिओग्रस्त होता. मात्र, शारीरिक व्याधीवर मात करीत त्यांनी प्रतिभेच्या बळावर लोकप्रियता मिळवली. परिस्थितीवर मात करून यश मिळविण्याचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.जुन्या नागपूरने जपलीय संस्कृतीनागपुरात पुलाच्या पलीकडचे व अलीकडचे असे जुने व नवीन नागपूर आहे. पश्चिम नागपूरला नवीन व मॉडर्न भाग मानण्यात येते. मात्र मी जुन्या शहरात राहत असल्याचा मला अभिमान आहे. जुन्या नागपूरने संस्कृती, परंपरा जपली आहे. येथील गरीब लोक, आठवडी बाजार यात आजही आत्मीयता दिसून येते. हा भाग मी कधीच सोडणार नाही, अशी भावना गडकरींनी व्यक्त केली.
नागपूरमध्ये देशाचे केंद्र होण्याची क्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 1:32 AM
नागपूरचा विकास गतीने होत आहे. गडकरी व फडणवीस हे दोन्ही नेते त्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
ठळक मुद्देराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन : कविवर्य सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण