नागपूर : तेलगंणात शेतकऱ्यांना वीज व पाणी मोफत दिले जाते. सरकारतर्फे योग्य दरात शंभर टक्के कषी उत्पादनांची खरेदी केली जाते. त्यामुळे तेथे आत्महत्या थांबल्या आहेत. महाराष्ट्रात वीज निर्मितीसाठी लागणारे कोळशाचे साठे मुबलक आहेत. नद्यांची संख्याही मोठी आहे. असे असतानाही येथील शेतकऱ्यांना वीज व पाणी मिळत नाही. जोवर तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात लागू होत नाही तोवर आपण येथे लढू, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांनी केली.
बीआरएसच्या महाराष्ट्रातील पहिल्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या गुरुवारी झाले. यानंतर सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात राव यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी मोठ्या प्रमाणात विदर्भातील नेते व प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश घेतला. मेळाव्याला माजी खा, हरिभाऊ राठोड, माजी आ. चरण वाघमारे, माजी आ. राजू तोडसाम, माजी सनदी अधिकारी टी.चंद्रशेखर, प्रदेश अध्यक्ष माणिकराव कदम, शंकर अण्णा, विठ्ठल नाईक, प्रकाश पोहरे, प्रा. ज्ञानेश वाकुडकर आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री राव म्हणाले, देशात पावसाच्या रुपात पडणारे ५० हजार टीएमसी पाणी समुद्रांमध्ये वाहून जाते. दुसरीकडे शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळत नाही. हे चित्र बदलायचे असेल तर सर्वप्रथम आपले राष्ट्रीय जलधोरण बंगालच्या खाडीत फेकून देत नवे जलधोरण आखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
माजी आ. चरण वाघमारे म्हणाले, गुजरात मॉडेल फसवे निघाले. आपण गेल्या आठ वर्षात तेलंगणाचा झालेला विकास पाहिला. त्यामुळेच आपण तेलंगणा मॉडेल स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. माजी खा. हरिभाऊ राठोड यांनी तेलंगणाच्या धर्तीवर स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मीतीची मागणी केली.
बीआरएस प्रत्येक निवडणूक लढेल
- महाराष्ट्रात जवळपास सर्वच प्रमुख पक्षांना सत्तेची संधी मिळाली. मग त्यांनी परिवर्त का घडविले नाही ? चांगले काम करणाऱ्यांना जनता संधी देते. बीआरएस हे भारत परिवर्तनाचे मिशन आहे. परिवर्तनासाठी बीआरएस प्रत्येक निवडणूक लढेल, अशी घोषणा करीत ‘अबकी बार, किसान सरकार’चा नारा मुख्यमंत्री राव यांनी दिला. गुलाबी वादळ महाराष्ट्रात दाखल झाले असून येथे पक्षाला विजय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे व मुंबईतही पक्षाच्या कार्यालय सुरू करण्याची घोषणात्यांनी केली. पुढील काळात आपण मध्य प्रदेशातही जाणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीसाठी जाती-धर्मावरून फूट पाडणे सुरू
- निवडणुका जिंकण्याच्या नादात जनतेची दिशाभूल केली जात आहे. जाती, धर्माच्या नावावर फूट पाडून निवडणुका जिंकण्याचे प्लान आखले जात आहेत. पण या पलिकडे जाऊन जोवर जनतेचा विजय होत नाही तोवर परिवर्तन होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.