धनंजय कापसीकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. याच आरक्षणामुळे सामान्य घरांमधील महिलांमध्ये असलेले नेतृत्वगुण विकसित व्हायला सुरुवात झाली. कन्हान (ता. पारशिवनी) येथील नगराध्यक्ष करुणा आष्टनकर या यापैकीच एक. त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळताच त्या राजकीय प्रवाहात आल्या. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावल्याने त्यांनी जनतेचा विश्वासही संपादन केला.
निवडणूक जिंकायची म्हटली तर अमाप पैसा खर्च करण्याची आर्थिक क्षमता असायला हवी. परंतु, करुणा आष्टनकर यांच्याबाबतीत हे समीकरण चूक ठरले. घरी छाेटेसे किराणा दुकान असल्याने त्या शिवणकाम करून संसाराला हातभार लावायच्या. मात्र, अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा गुण नागरिकांना आवडला. हा गुण आपल्या आई सुमित्राबाई अंबागडे यांच्याकडून मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या समस्या साेडविण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही.
ठिय्या आंदाेलनाला यश आल्याने नागरिकांच्या आग्रहास्तव त्यांनी २००८ साली कन्हान ग्रामपंचायतची पहिल्यांदा निवडणूक लढविली. परंतु, त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला. परंतु, त्यांनी या अपयशामुळे खचून न जाता लाेककार्य सुरूच ठेवले. पुढे २०१२ च्या निवडणुकीत त्या पंचायत समितीमध्ये पाेहाेचल्या. यावेळी त्यांना अडीच वर्षे सभापतिपदही मिळाले. पुढे कन्हान ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाले. नगरपालिकेत नगरसेवकपदी सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येण्याचा मानही मतदारांनी त्यांना दिला. सन २०२० मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना नगराध्यक्ष म्हणून निवडले. इतर क्षेत्राप्रमाणे नागरिकांच्या समस्या साेडविण्यातही महिला मागे नाहीत. ग्रामीण भागातील महिलांनी मनात भीती न बाळगता देशसेवेसाठी पुढे यायला हवे. यातून महिलांचे सबलीकरण हाेऊ शकते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
...
पाणी समस्या व ठिय्या आंदाेलन
कन्हान शहरातील धरमनगरात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवली. ही समस्या निर्माण झाली, त्यावेळी कन्हान ग्रामपंचायत हाेती. ही समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांनी पदर खाेचून महिलांना गाेळा केले आणि ग्रामपंचायत कार्यालयासमाेर ठिय्या आंदाेलनाला सुरुवात केली. त्यांच्या या आंदाेलनाला यश आले. त्यांनी पाण्यासाेबतच इतर मागण्याही पूर्ण करवून घेतल्या. या आंदाेलनात त्यांच्यातील नेतृत्वगुण प्रकर्षाने दिसून आले.