लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : कवठा-म्हसाळा (ता. कामठी) ग्रामपंचायत अंतर्गत सिमेंट नाली बांधकामात गैरप्रकार करण्यात आल्याचा आराेप स्थानिक नागरिकांनी केला असून, या बांधकामाची गुणनियंत्रण विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यातील दाेषींवर कारवाई न केल्यास आंदाेलनाचा इशाराही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी याेगेश कुंभेजकर यांच्याकडे केलेल्या तक्रारीत दिला आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने कवठा-म्हसाळा येथील वाॅर्ड क्रमांक-२ मध्ये सिमेंट नालीच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. या कामासाठी ग्रामपंचायतच्या सामान्य फंडातून २ लाख ७० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या बांधकामात जुन्या व गंजलेल्या लाेखंडी सळाकींचा वापर केला जात आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रभारी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याच्या संगनमताने भ्रष्टाचार केला जात आहे.
यासंदर्भात स्थानिक आमदाराकडे तक्रारी करण्यात आली हाेती. त्यांनी या प्रकरणाची चाैकशी करण्याचे आदेश दिले हाेते. परंतु, कुठलीही चाैकशी झाली नाही, असेही या तक्रारीत नमूद केले आहे. परिणामी, या बांधकामाची निरपेक्ष चाैकशी करण्यात यावी तसेच दाेषींवर कारवाई करावी, अशी तक्रारही नागरिकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी याेगेश कुंभेजकर, पंचायत समिती सभापती उमेश रडके, खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केली आहे. शिष्टमंडळात नीलेश डफरे, ममता बरबटकर, रवी कुहिटे, संगीता किरपाने, मीना खेरगडे, सुनंदा मनगटे, शंकर बरबडकर, राहुल मेश्राम यांच्यासह गावकऱ्यांनी समावेश हाेता.
...
या सिमेंट नालीचे बांधकाम शासकीय नियमानुसार केले जात आहे. यात काेणताही भ्रष्टाचार अथवा गैरप्रकार करण्यात आला नाही. ही तक्रार राजकीय भावनेने प्रेरित हाेऊन करण्यात आली आहे. त्यात लावण्यात आलेले सर्व आराेप खाेटे आहेत.
- शरद माकडे, सरपंच (प्रभारी),
कवठा-म्हसाळा, ता. कामठी.