नागपूर : केवळ १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्याच्या सूचना असताना एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात यांत्रिक तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती होत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागपूर शहर तसेच जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने शारीरिक अंतर राखणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे तसेच ५ पेक्षा अधिक जणांनी गोळा न होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. केवळ १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्याच्या सूचनाही एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने दिल्या आहेत. तरीसुद्धा एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. यांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांना १०० टक्के कामावर बोलाविण्यात येत आहे. आतापर्यंत नागपूर विभागात १२५ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून १५ कर्मचाऱ्यांचा जीव गेला आहे. तरीसुद्धा एसटी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. एकाच ठिकाणी ४० ते ५० कर्मचारी एकत्र काम करीत आहेत. यांत्रिक कर्मचाऱ्यांची गरज नसताना दोन पाळीत कामावर बोलावून गर्दी करण्यात येत आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून विभागात मध्यवर्ती कार्यालयाच्या परिपत्रकाचे पालन करण्याची मागणी होत आहे.
...............
प्रशासनाने कर्मचाऱ्यांना सुरक्षितता द्यावी
‘केवळ १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्याच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या सूचना आहेत. तरीसुद्धा नागपूर विभागात १०० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असून प्रशासनाने एसटी कर्मचाऱ्यांना सुरक्षितता देणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षितता न दिल्यास संघटनेला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.’
- अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना
..............