नागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाला गती देण्याशिवाय पर्याय नाही. याची जाणीव ठेवत महापारेषण कंपनीने दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या सीएसआर निधीतून विदर्भ सहायता सोसायटीने विदर्भातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना लसीकरणासाठी तब्बल २०० वाहने ‘सद्भावना जीवनरथ’ उपलब्ध करून दिले. खास लसीकरणासाठी तब्बल २०० वाहने उपलब्ध करून देण्याचा देशातील हा पहिला व सर्वात मोठा उपक्रम ठरला आहे.
२०० सद्भावना जीवनरथ लसीकरण वाहनांचे हस्तांतरण शुक्रवारी मानकापूर क्रीडा संकुलात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दृक्श्राव्य पद्धतीने सोहळ्यात सहभागी झाले. कार्यक्रमाला ऊर्जामंत्री नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनील केदार, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आ. राजू पारवे, मनपाचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे उपस्थित होते. याशिवाय आरोग्य मंत्री राजेश टोपे, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे हे दृक्श्राव्य पद्धतीने सहभागी झाले होते.
यावेळी मिशन लसीकरण अभियानाची सुरुवातही करण्यात आली. विदर्भातील एका तालुक्याला प्रत्येकी दोन वाहने याप्रमाणे ही दोनशे वाहने दिली जातील. नागपूर विभागासाठी १२८ तर अमरावती विभागासाठी ७२ लसीकरण वाहने हस्तांतरित करण्यात आली. खास लसीकरणासाठी तब्बल २०० वाहने उपलब्ध करून देण्याचा देशातील हा पहिला उपक्रम असल्याचे सांगत देशानेच नव्हे तर जगाने याची नोंद घ्यावी, अशा शब्दांत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. नितीन राऊत यांनी लसीकरण वाहनांच्या माध्यमातून मेळघाट, गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागात पाेहोचून लसीकरणासह आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
प्रास्ताविक विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले. संचालन उपायुक्त आशा पठाण यांनी केले तर जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आभार मानले.
कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणच पर्याय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- कोरोनावर सध्या प्रभावी औषध नसल्यामुळे लस ही ढाल म्हणून काम करीत आहे. येत्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन लसीकरण एकमेव पर्याय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.