सुमेध वाघमारे
नागपूर : अवयवाच्या प्रतीक्षेत मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या रुग्णावर ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून मिळालेल्या अवयवाचे यशस्वी प्रत्यारोपण होत असल्याने मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. नागपुरातील तज्ज्ञांनी प्रत्यारोपणानंतर रुग्णांचा जगण्याचा अभ्यास केला असता, मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपणाच्या पहिल्या वर्षात जवळपास ८८ टक्के तर पाच वर्षांत ७५ टक्के रुग्णांना आयुष्य जगण्याची आणखी एक संधी मिळत असल्याचे दिसून आले.
जो जन्माला आला, त्याचा मृत्यू निश्चित आहे. शरीर हे क्षणभंगूर आहे, मृत्यूनंतर सारे नष्ट होते. केवळ आप्तेष्टांच्या आठवणीत जिवंत राहते. परंतु अवयवदानाच्या माध्यमातून त्या व्यक्तीचे अस्तित्व प्रत्यक्षात जिवंत राहते. याची जनजागृती वाढल्याने व काही लोक यासाठी पुढाकार घेत असल्याने, अनेक गरजू रुग्णांना नवआयुष्य मिळत आहे. ‘झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन सेंटर’च्या वतीने (झेडटीसीसी) २०१३ ते ३१ मार्च २०२२ यादरम्यान ८९ ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवांचे दान झाले. यात १५४ मूत्रपिंड तर ६० यकृत प्रत्यारोपण झाले. हा आकडा समाधानकारक असला तरी गरजू रुग्णांची संख्या पाहता, यात आणखी वाढ होणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अमेरिकेत मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर पाच वर्षांपर्यंत ८६ टक्के रुग्ण जगतात
झेडटीसीसीच्या मूत्रपिंड समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही. एल. गुप्ता यांनी १४० मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपणानंतर जगत असलेल्या रुग्णांचा छोटेखानी अभ्यास केला. यात त्यांना नागपूर विभागात पहिल्या वर्षापर्यंत ८८.१३ टक्के तर, पाच वर्षांपर्यंत ७४.५७ टक्के रुग्ण जगत असल्याचे दिसून आले. भारतात एकूण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या पहिल्या वर्षापर्यंत ८८.२ टक्के तर, पाच वर्षांपर्यंत ६१.७१ टक्के रुग्ण जगतात. अमेरिकेत पहिल्या वर्षापर्यंत ९५ टक्के तर, पाच वर्षांपर्यंत ८६ टक्के रुग्ण जगत असल्याची माहिती आहे.
- नागपूर विभागात यकृत प्रत्यारोपणानंतर पहिल्या वर्षापर्यंत ८३ टक्के रुग्ण जगतात
झेडटीसीसीच्या यकृत प्रत्यारोपणाचे सहसचिव डॉ. राहुल सक्सेना यांनी सांगितले, नागपूर विभागात यकृत प्रत्यारोपण सुरू होऊन तीनच वर्षे झाली आहेत. आतापर्यंत ६० यकृतांचे प्रत्यारोपण झाले. त्यानुसार नागपूर विभागात पहिल्या वर्षापर्यंत ८८ टक्के एकूण भारतात ८५ टक्के तर अमेरिकेत ९३ टक्के रुग्ण जगतात. तीन वर्षानंतर हेच प्रमाण नागपूर विभागासह भारतात व अमेरिकेत ८५ टक्क्यांपर्यंत आहे.
- प्रत्यारोपणानंतर तरुण रुग्णांमध्ये जगण्याचे प्रमाण अधिक
मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर रुग्ण जगण्याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. प्रत्यारोपणानंतर तरुण रुग्णांमध्ये जगण्याचे प्रमाण अधिक आहे. पाच वर्षांपर्यंत जगण्याचे प्रमाण कमी होण्यामागे इतर गंभीर आजार कारणीभूत ठरतात.
- डॉ. व्ही. एल. गुप्ता, अध्यक्ष मूत्रपिंड समिती झेडटीसीसी
यकृत प्रत्यारोपणानंतर पहिल्या वर्षात संसर्गाचा धोका अधिक
यकृत प्रत्यारोपणानंतर पहिल्या वर्षात संसर्गाचा धोका अधिक राहतो. त्यानंतर रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो. परंतु औषधांच्या दुष्परिणामामुळे इतर अवयवांचे आजार वाढण्याचा धोका असतो. यामुळे वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.
- डॉ. राहुल सक्सेना, सहसचिव यकृत प्रत्यारोपण झेडटीसीसी