नागपूर : माेसमी पावसाने जून महिन्यात काहीसा भ्रमनिराश केला असला तरी जुलैमध्ये ताे जाेरदार बरसण्याची शक्यता आहे. सांख्यिकीच्या टरसाईल वर्गीकृत श्रेणीनुसार विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात जुलै महिन्यात १०६ टक्के म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे तीन दिवस विदर्भात जाेरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात विदर्भाचे नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, अकोला अमरावती, वाशिम, वर्धा या जिल्ह्यात १०६ टक्के म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. केवळ यवतमाळमध्ये सरासरीऐवढा म्हणजे ९६ ते १०४ टक्के पाऊस हाेईल. यासह मुंबई, काेकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागातही सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. म्हणजे काेणत्याही जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता नसल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
या महिन्यात दिवसाचे कमाल तापमान हे जुलैच्या सरासरीपेक्षा थाेडे अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसा ताप वाढून अधिक आर्द्रता निर्माण हाेण्याची व त्यामुळे अधिक पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानही अधिक राहण्याचा अंदाज आहे.
ऑगस्टमध्ये ‘लाॅ निना’, ‘आयओडी’ही पुरकहवामान विभागानुसार तटस्थ असलेल्या एन्साेमुळे सध्या देशात पावसाची स्थिती पुरक आहे. शिवाय ऑगस्ट महिन्यात लाॅ-निना सक्रिय हाेण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे भारतात पावसासाठी मदत करणारी भारत महासागर द्वि-ध्रुविता (आयओडी) तटस्थतेकडे झुकत असून त्यामुळे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराची तापमानाची स्थिती पावसासाठी पूरक असल्याचे व्यक्त केले जात आहे.