नागपूर : नानाविध प्रकारच्या देशी आणि विदेशी अशा वैशिष्टयपूर्ण रेसिपींनी खव्वयांना तृप्तीची ढेकर द्यायला लावणारे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सलग ५३ तास कुकिंग करून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. आठ चुलींवर अखंड सुरू असलेल्या या अन्नयज्ञात मनोहर यांनी तब्बल दहा हजार प्रकारची स्वादिष्ट व्यंजनं तयार करून सर्वांना अचंबित केले.मैत्री परिवाराच्या पुढाकाराने २१ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअर्स सभागृहात सुरू झालेली शेफ विष्णु मनोहर यांची ही ‘कुकिंग मॅरेथॉन’ ५३ तासांचा विश्वविक्रम नोंदवून रविवारी सांयकाळी ५.३० वाजता थांबली. या विक्रमाची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेतली जाणार आहे. याआधी असा विक्रम अमेरिकेच्या बेंझामिन पेरींच्या नावावर होता. त्यांनी २०१४ साली सलग ४० तास कुकिंग करून हा विक्रम नोंदविला होता. पेरी यांनी शाकाहारी व मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे व्यंजनं तयार केली होती. मात्र, मनोहर यांनी तब्बल दहा हजार प्रकारची फक्त शाकाहारी व्यंजनं तयार केली. याचीही वेगळी नोंद घेतली जाणार आहे.मनोहर यांचे विश्वविक्रमी कुकिंग यशस्वी करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांनी हातभार लावला. हे कुकिंग बघण्यासाठी नागपूरकरांनी मोठी गर्दी केली होती. ५३ तासांचे कुकिंग होताच एकच्च जल्लोष करत मनोहर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. हा विक्रम आपण राज्यातील बळीराजाला अर्पण करत असल्याचे मनोहर यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)
अबब! सलग ५३ तास कुकिंग
By admin | Published: April 24, 2017 3:16 AM